पुणे : मी लहानपणापासून पुण्यात नेहमी येत असताे. पुणे बदलले असून, खूप समस्या दिसून येत आहेत. राजसाहेबांनी आदेश दिला तर मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवू शकतो, असे सूचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले.
अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनविसेचे गजानन काळे, प्रशांत कनोजिया उपस्थित होते.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत पक्षाचे नेते वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे त्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, ‘राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणे काय बीडमध्येही मी लाेकसभेची निवडणूक लढवू शकताे. मात्र, मी स्वत:हून लाेकसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अद्याप विचार केलेला नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले, ‘दोन पक्षांचे चार गट झाल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंनी सूत्रे हातात घेऊन, सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. राहायला वसतिगृह नाहीत. अनेक वर्षांपासून मराठी भाषा भवनाचे काम अपूर्ण आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय कारकिर्दीतील पहिला गुन्हा पुण्यात अंगावर घेण्याची तयारी आहे. आगामी काळात मनविसेने प्रत्येक विद्यापीठाची सिनेट निवडणूक लढवण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मोर्चे काढण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.