लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात काही रेशनिंग दुकानदार दुकानदारांकडून धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर नागरिकांची अडवणूक केली जाते. एखाद्या रेशनिंग दुकानदाराकडून अशी अडवणूक केली जात असले, तर नागरिकांना आपल्या जवळच्या अन्य कोणत्याही रेशनिंग दुकानात जाऊन धान्य घेता येऊ शकते. शासनाने प्रत्येक लाभार्थ्यांला धान्याचा लाभ घेता यावा म्हणून ही पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु पुणे जिल्ह्यात केवळ 12 हजार 996 कुटुबांनीच या सवलतीचा लाभ घेतला आहे.
कोरोना काळात शासनाने बहुतेक सर्व कार्ड धारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य वाटप केले. परंतु अनेक कुटुंबाने या कालावधीत स्थलांतर केल्याने कोणत्याही पात्र लाभार्थ्यांने आपाले रेशनकार्ड व बारा अंकी नंबर दिल्यानंतर कोणत्याही रेशनिंग दुकानांमध्ये धान्य उपलब्ध करून देण्याची सवलत दिली. ही सवलत पूर्वी पासूनच असली तरी कोरोना काळात अनेकांना पोर्टेबिलिटीची लाभ घेता आला.
पुणे जिल्ह्यात तब्बल 8 लाख 93 हजार 424 रेशनकार्ड धारक असून, यापैकी सध्या केवळ अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लोकांनाच धान्य वाटप केले जात आहे. कोरोना काळात बहुतेक सर्वच कार्ड धारकांना सवलतीच्या दरात धान्य दिले. याच कालावधीत अनेक रेशनिंग दुकानदाराबाबत तक्रारी देखील आल्या. अशा सर्व दुकानदारांवर कारवाई झाली.
-------
- जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक : 8 लाख 93 हजार 424
- पोर्टेबिलिटीचा लाभ घेतलेले कार्डधारक : 12 हजार 996
------
जिल्ह्यात 113 दुकानदारांवर कारवाई
कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या वतीने सर्व स्तरातील लोकांना मोठ्या प्रामाणात धान्य वाटप केले. यामध्ये मोफत धान्यासह सवलतीच्या दरामध्ये देखील धान्य वाटप केले. परंतु याच संधीचा फायदा घेत काही रेशनिंग दुकानदारांनी रेशनिंगवर आलेल्या धान्याचा काळाबाजार केला. या प्रकरणात जिल्ह्यात 113 दुकानदारांवर प्रशासनाकडून कारवाई केली. यात शहरातील 74 तर ग्रामीण भागातील 39 दुकानदारांचा समावेश आहे.
-------
नागरिकांच्या सोयीसाठी पोर्टेबिलिटीची सुविधा
शासनाने नागरिकांना आपल्या सोयीनुसार पाहिजे तेथे रेशनिंगचे धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यात ज्या दुकानदारांबाबत तक्रारी आल्या आहेत, अशा दुकानदारांची चौकशी करून कारवाई करण्यात येते.
- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी