लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बाजार समितीने शिवनेरी रस्त्यावरील फळ विक्रेत्यांना अवाजवी भाडे आकारणी केली असून, ती परवडणारी नाही. आम्ही रितसर रास्त भाडे देण्यास तयार आहोत. त्यासाठी निकष ठरवून घेण्याची आमची तयारी आहे. मात्र आमचा बंद झालेला धंदा सुरु करावा अन्यथा येत्या ४ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा पथारी व्यावसायिक पंचायतीचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते डॉ़ बाबा आढाव यांनी दिला.
पथारी व्यावसायिक पंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ़ बाबा आढाव यांनी भूमिका मांडली यावेळी सरचिटणीस बाळासाहेब मोरे, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांच्यासह पथारी व्यावसायिक
उपस्थित होते.
डॉ़ बाबा आढाव म्हणाले की, कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शिवनेरी रस्त्यावर आमचे सभासद ४० वर्षांहून अधिक काळ फळविक्रीचा व्यवसाय
करीत आहेत़ सुरुवातीला रस्त्याच्या दक्षिणबाजुला फुटपाथवर व्यवसाय करीत होते. त्यानंतर आम्ही पुर्नवसनाची मागणी केल्यानंतर बाजार समितीने
सध्याच्या जागेवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे़ या जागेवर १७ वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत. मात्र गेल्या महिन्यात बाजार समितीने अतिक्रमण कारवाई केली. त्यानंतर प्रतिदिन ५९० रुपये भाडे भरावे लागेल असे प्रशासकांनी सांगितले. हे भाडे न परवडणारे आहे़ रास्त व न्याय निकष ठरवून भाडे आकारावे अशी आमची मागणी आहे़ या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली आहे. सद्यस्थितीत व्यापार बंद असल्याने उपासमार होत असून व्यवसाय पुर्ववत सुरु व्हावा अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशाराही डॉ. आढाव यांनी दिला. दरम्यान शिवनेरी रस्त्यावरील तालेरा गार्डन जवळील जागेत फळविक्रेते व्यवसाय करत आहेत ही जागा खरंच बाजार समितीची आहे का? याची तपासणी गरड यांनी करावी. आमचे अतिक्रमण हे तालेरा गार्डनमध्ये आहे. त्या गार्डनचे मालक आणि आम्ही बघून घेवू, अशी भूमिका कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी घेतली.
---
मुख्य शिवनेरी रस्ता हा पूर्णत: बाजार समितीच्या मालकीचा
कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मुख्य शिवनेरी रस्ता हा पूर्ण:त बाजार समितीच्या मालकीचा आहे. रस्त्याच्या उतरेकडील पेट्रोल पंपाच्या समोरील जागा ही बाजार समितीच्या मालकीची आहे. बाजार समितीच्या पुणे महानगरपालिकेने मंजूरकेलेल्या आराखड्यात सदर जागेचा समावेश असून, ती जागा बाजार समितीची असल्याचे स्पष्ट आहे.
- मधुकांत गरड, प्रशासक कृषि उत्पन्न बाजार समिती