पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करायला सुरुवात केली. विषाणू नाहीसा झाला आहे अशा थाटात सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. नागरिकांचा निष्काळजीपणा आणि गाफील राहिलेली आरोग्य यंत्रणा यामुळे दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आणि रुग्णसंख्येचा उद्रेक झाला. तिसऱ्या लाटेबद्दलची शक्यता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गृहीत धरण्यात आली आहे. या लाटेला रोखायचे असेल, तर पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुका टाळाव्या लागणार आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रण, प्रशासन आणि नागरिक सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे.
------
या पाच चुका पुन्हा करू नका !
१. भारतालाही दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल, असे भाकीत तज्ज्ञांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच वर्तवण्यात आले होते. त्यानुसार तयारी करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला होता. मात्र, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग केला गेला नाही. बेडची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता, औषधांची गरज याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर अनेक आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची ससेहोलपट झाली. पहिल्या लाटेत झालेली लूट टाळण्यासाठी दुसऱ्या लाटेत काहीही करण्यात आले नाही.
२. पहिल्या अनलॉकनंतर आणि पहिली लाट ओसरल्यावरही नागरिकांचा निष्काळजीपणा चिंतेत भर घालणारा होता. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझर हे सगळे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले. कोरोना विषाणू जणू आपल्यातून निघून गेला आहे, असे समजण्याची चूक केली. या काळात सॅनिटायझर, मास्कची मागणी कमी झाल्याचे निरीक्षण औषध विक्रेत्यांनी नोंदवले होते. सर्व सार्वजनिक ठिकाणे खुली झाल्याने लोकांचे घराबाहेर पडण्याचे, पर्यटनाला जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले.
३. पहिल्या लाटेत सर्वच शहरांमध्ये तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या होत्या. लाट ओसरल्यानंतर त्या तातडीने बंद करण्याची घाई शासनाने केली. त्या सुविधा सुरू ठेवल्या असत्या आणि त्याप्रमाणे मनुष्यबळ तैनात करून ठेवले असते तर दुसरी लाट अचानक आल्यावर त्याचा सामना करताना नाकी नऊ आले नसते.
४. पहिली लाट थोपवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच लसींच्या मानवी चाचण्यांना सुरुवात झाली होती. देशातील एवढ्या मोठ्या लोकसंख्येला किती मोठ्या प्रमाणात लसींचे डोस लागतील, याचा अंदाज बांधणे अवघड नव्हते. लसींची गरज लक्षात घेऊन आपल्या सरकारने लस उत्पादक कंपन्यामध्ये आर्थिक गुंतवणूक केली नाही. परिणामी, आपल्याला अद्याप लसीकरणात हवा तितका वेग पकडता आलेला नाही.
५. पाच राज्यांंतील निवडणुका, महाराष्ट्रातील पोटनिवडणूक यानिमित्ताने झालेल्या सभा, प्रचार यात्रा, कुंभमेळ्यासारखे कार्यक्रम यामुळे ठिकठिकाणी गर्दी वाढलेली पाहायला मिळाली. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला.
-----
पहिला अनलॉक :
४ ऑगस्ट २०२०
एकूण कोरोना रुग्ण - ५९४९६
बरे झालेले - ४१२५१
मृत्यू - १४१२
दुसरा अनलॉक :
१ जून २०२१
एकूण कोरोना रुग्ण - ४७०३११
बरे झालेले - ४५६५०९
मृत्यू - ८२८४
----
भरारी पथकांची असेल नजर :
महापालिकेने १ जूनपासून पुढील १० दिवस निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक आणि इतर दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असणार आहेत. दहा दिवसानी पॉझिटिव्हीटी रेटचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णसंख्या वाढल्याचे लक्षात आल्यास
निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आपापल्या वॉर्डमधील पाहणी करण्यासाठी पथके निर्माण करण्यास सांगण्यात आले आहे.