गोलेगाव : तर्डोबाच्या वाडीतील जांभळीमळा येथील शेतकरी शिवाजी कर्डिले यांनी सुमारे अडीच एकरात कांद्याची लागवड केली असून आता कांदा काढणी शेवटच्या टप्यात आहे. तरीही प्रतिक्विंटलला पाचशे रुपये इतका कवडीमोल भाव मिळाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पोषक हवामानामुळे कांदापिक जोमात आल्याने उत्पादन भरघोस झाले. मात्र त्या तुलनेत उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेती करावी की करु नये याच प्रश्नाभोवती शेतकरी घुटमळत आहे. म्हणूनच की काय शेतकरी आजपर्यंत संपावर गेला नव्हता तो आत्ता जाण्याच्या तयारीत आहे. आणि त्यामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या शेतीला अनुदान स्वरुपात किंवा पिकांच्या हमीभाव स्वरुपात भाव देण्याची चर्चा शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे. कांदा हे एक नगदी पिक असुन त्याचे पैसे रोख स्वरुपात मिळत असल्याने बहुतेक शेतकरी कांदा मोठ्या प्रमाणावर लावतात. बाजारभाव कमी असल्यावर काहीजण तो साठवून ठेवतात. परंतु सर्वांकडेच साठवणुकीच्या सुविधा नसतात. साठवणुकीची सोय नसणाऱ्या शेतकऱ्यांना कांदा काढल्यावर लगेचच व्यापाऱ्याला जागेवर देणे भाग पडते. व्यापारी तो पड्या भावाने मागतो. नाईलाजाने शेतकऱ्याला तो द्यावा लागतो. ज्यांनी मागील वषीर्चा कांदा साठवून ठेवला होता त्यांनाही वर्षभर चांगला भाव मिळाला नाही व तो आरणीतच सडून गेला. त्यामुळे सरकारने नियोजनबद्ध शेतीव्यवस्थापन व बाजारभावाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी संपूर्ण शेतकरी वगार्ची आहे.(वार्ताहर)
हंगाम संपत आला तरी भाव मिळेना
By admin | Published: April 10, 2017 2:13 AM