पुणे : पुण्यातील मनसेचे डँशिंग नेते वसंत मोरे सध्यस्थितीत नेहमीच चर्चेत येऊ लागले आहेत. सामाजिक कार्य आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात मोरे अग्रेसर असल्याने त्यांचे नाव आघडीवर असते. त्यातच आता मोरेंचा मुलगा रुपेश मोरे याला काल धमकीचे पत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावरच वसंत मोरे यांनी एका वृत्तपत्र माध्यमाशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली आहे. माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून काही चूक झाली असेल तर आपण त्यावर बोलू शकतो. उगाच वेगळ्या मार्गाला जाऊ नका. यामधून काहीही साध्य होणार नाही असं ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेला मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. यावरून मोरेंबाबत राजकीय चर्चाना उधाण आले होते. पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे आणि इतर मनसेचे पदाधिकारी यांच्यात मतभेद दिसून आले. बैठकीलाही वसंत मोरेना आमंत्रण दिले नव्हते. परंतु मोरे यांनी आम्ही अजूनही राज साहेबांसोबाबत आहोत असा विश्वास दर्शवला होता. आताही सामाजिक कार्यात वसंत मोरे अग्रेसर आहेत. आपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या ते नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही विरोधकच मोरेंवर खार खाऊन असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यातच आता मोरेंचा मुलगा रुपेश मोरे याला काल धमकीचे पत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रितसर तक्रारीची नोंद केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे.
कसा घडला हा प्रकार
मोरे म्हणाले, राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त थोरवे शाळेच्या मैदानावर आम्ही रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. रुपेशही त्यावेळी माझ्यासोबत होता. पण मेळावा संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. आणि मी कात्रजला परत आलो. तर रुपेश मित्रांसमवेत मोरबागला गेला. थोड्या वेळाने रुपेशने मला फोन करून अडचणीत असल्याचे सांगितले. त्याला काय झाले असे विचारल्यावर त्याने मला व्हाट्स अँपवर चिठ्ठीचा फोटो पाठवला. त्यामध्ये 'रुपेश सावध राहा' असे लिहिण्यात आले होते. आणि ती चिठ्ठी गाडीच्या काचेवर वायपरमध्ये अडकवण्यात आली होती असे त्यांनी यावेळी सांगितले.
उगाच वेगळ्या मार्गाने जाऊ नका
या सगळ्या प्रकारानंतर अनेकांना असं वाटतंय कि, मी राजकारणात असल्यामुळे हे सगळं होतंय. मलाही कुठेतरी याचे वाईट वाटतंय, ज्या कोणी काही केलं असेल तर त्याने समोर यावे. कळत-नकळत आपल्यावर कोणी रागवत असतो, पण तेव्हा आपल्या मनात काही नसतं. त्याच्याकडून किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आपण त्यावर बोलू शकतो. पण उगाच वेगळ्या मार्गाने जाऊ नका, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
या प्रकारानंतर वसंत मोरेंनी लिहिलेली फेसबुक पोस्ट
"मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही... राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही...गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे...साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये "सावध रहा रुपेश" आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली...तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय...आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?हे का तेच कळत नाही...भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत...तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय...बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे...!"
असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत वसंत मोरे यांनी धमकी देण्यात आलेल्या चिठ्ठीचाही फोटो यासोबत पोस्ट केला आहे.