पुणे : अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात राज्यात सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सरकारने मद्यालये, हॉटेल, दुकाने,एसटी बसेस यांच्यानंतर आता रेल्वे सुरु करण्यास देखील परवानगी दिली आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल या भीतीने अद्यापही राज्यातील मंदिरे कुलुपबंद आहे. कोरोनाचे नाव पुढे करून देवालये उघडायला ठाकरे सरकार घाबरते आहे का ? कोरोना काय फक्त देवळातच आहे ? असा खडा सवाल उपस्थित करत शासनाने जर आता मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली नाही तर मनसे राज ठाकरेंच्या आदेशानुसार मंदिरं उघडेल, असा गर्भित इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिर बुधवारी (दि. ७) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघडत तिथे अभिषेक व होम करत आंदोलन केले. तसेच देवबाप्पा, राज्य सरकारला धार्मिक स्थळे सुरु करण्याची सुबुद्धी देवो असे म्हणत नागरिकांना कोरोनामधून लवकरात लवकर मुक्त कर व त्यामुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर असे साकडे देखील मनसेतर्फे घालण्यात आहे. या आंदोलनात मनसे नेते बाबू वागसकर,विजयराव तडवलकर, प्रल्हाद गवळी , राम बोरकर ,हेमंत बत्ते, सुनील कदम , राहुल गवळी , नरेंद्र तांबोळी, प्रशांत मते ,गणेश नायकवडी, आकाश धोत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मनसेचे अजय शिंदे म्हणाले, स्वतःला हिंदुत्ववादी समजणारी व त्याच्याच नावावर मते मागणारी शिवसेना सत्तेत आहे. मात्र सेनेचा मुख्यमंत्री असताना देखील राज्यातील मंदिरे बंद आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे. यावरूनच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परंतु, एकीकडे सरकार महसुलासाठी मद्यालये उघडते तर दुसरीकडे कोरोनाचे नाव पुढे करून देवालये उघडायला घाबरते आहे. कोरोना काय फक्त देवळातच आहे का ? महाराष्ट्रातील देवालये न उघडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यावर नक्की कोणाचा दबाव आहे ? हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही, असे म्हणत महाविकास आघाडीला जोरदार टोला लगावला.
गेल्या महिन्यातच महाराष्ट्रातील देवस्थानाची प्रमुख मंडळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटली घेतली होती. त्यानंतर राज यांनी सरकारला मंदिरे सुरु करावीत अशी मागणी देखील केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत दबावापोटी मुख्यमंत्री राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेताना दिसत नाही. परंतु, हे सरकार निधर्मी असल्याची टीका करत जर सरकारने लवकरात लवकर मंदिरे उघडली नाही तर जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल हा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.