पुणे : महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाबरोबरच सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. एसटी महामंडळ आधीच तोट्यात असताना आता कोट्यावधींचा फटकाही बसला आहे. मागण्यासंदर्भात राज्य सरकार तोडगा काढणार असल्याचे सांगूनही कर्मचारी माघार घेण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांच्या संपाला (ST Strike) राजकीय पक्ष पाठिंबा देऊ लागले आहेत. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून टीकाही होऊ लागली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत राजकीय पक्षांनाही विनंती केली आहे. ते म्हणाले, "राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका, अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या." यावरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
''एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणं हे राजकारण आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते राजकारण असे तर आम्ही ते सदैव करत राहणार असल्याचे ते म्हणाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे. ती अत्यंत भीषण आहे. आतापर्यंत २९ आत्महत्या झाल्या मग आंदोलकांनी मोर्चासुध्दा नाही काढायचा का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.''
''आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि आमचे हेच काम आहे की, लोकशाहीमध्ये चुकीच्या गोष्टींना नेहमी विरोध करणे यामुळेच सरकार ठिकाणावर राहील. कॅव्हिडच्या काळातही एसटी सुरु होती. त्यांना अजूनही पगार न देऊन आणि अडीच हजार बोनस देऊन त्यांची थट्टा काय करताय असाही प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे. ''
शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती - उद्धव ठाकरे
"एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केले आहे. अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.''