नारायणगाव: पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जनसन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज जुन्नर तालुक्यात आहे. सकाळी ही यात्रा नारायणगाव येथे आली असता भाजप नेत्या आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.
यावेळी 'अजित पवार हाय हाय', 'पालकमंत्री हाय हाय..' अशी घोषणाबाजी केली. कार्यक्रमस्थळाबाहेर रस्त्यावर ठिय्या आंदोलन आणि रास्तारोको केल्याने वाहतुकीचाही बोजवारा उडाला. दरम्यान पर्यटन जुन्नर तालुका आढावा बैठकीला भाजपा पदाधिकारी यांना आमंत्रित न केल्याने काळे झेंडे दाखवीत पवार यांच्या सह आ. अतुल बेनके यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली , या घटनेमुळे महायुतीत असलेला अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा रविवारी जुन्नर तालुक्यात पोहोचली असता नारायणगाव येथे जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले.
माध्यमाशी बोलताना आशा बुचके म्हणाल्या, पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावलंल जातं आहे. पालकमंत्र्यांची ही भूमिका खपवून घेतली जाणार नाही. मी फक्त राष्ट्रवादीचा पालकमंत्री असून महायुतीशी माझा संबंध नाही असे अजित पवारांनी जाहीर करावी अशी मागणी करत अजित पवार पालकत्वाची भूमिका पाळत नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अजित पवार चोरून चोरून बैठका घेतात. प्रशासनाचा गैरवापर करतात. आमदार अतुल बेनके हा राष्ट्रवादीचाच कार्यक्रम असल्याचे सांगतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटोही गायब करतात. कोणत्याही बाबतीत आम्हाला विश्वास घेतले जात नाही. त्यामुळे युती मान्य नसेल तर अजित पवार यांनी ते जाहीर करावे, अशी मागणी आशा बुचके यांनी केली. दरम्यान , भाजपा नेत्या आशाताई बुचके आणि भाजपा तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे यांच्या सह कार्यकर्ते बसस्थानका समोर रास्तारोको करण्यासाठी निघाले असता सर्वांना ताब्यात घेतले.