पुणे : देशातील जातीवाद संपला आहे असे कोणी म्हणत असेल, तर मग त्यांनी जातनिहाय जनगणनेला विरोध का करावा? देशात एससी, एसटी, ओबीसी हे किती आहेत ते माहिती आहे. केवळ ‘जनरल’ वर्ग किती आहे, तो तपासायचा आहे. जातीनिहाय जनगणना केल्यानंतरच देशात कोणती जात किती टक्के आहे ते समजेल आणि त्यावरून मग कोण किती मागास आणि कोण किती उच्च ते कळेल. म्हणून जातनिहाय जनजणना करायला हवी,’’ अशी मागणी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केली.
एस. एम. जोशी सभागृहात शुक्रवारी (दि.८) गंगाधर गाडगीळ स्मृती व्याख्यान आयोजित केले होते. त्यात यादव ‘जातनिहाय जनगणनेचे राजकारण’ याविषयावर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते सुभाष वारे, तर व्यासपीठासमोर ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, अन्वर राजन आदी उपस्थित होते.
जातनिहाय जनगणना केली तर जातीयवाद वाढेल, असे बोलले जाते यावर यादव म्हणाले, केवळ जातनिहाय जनगणना करायची की नाही यावर चर्चा करत राहिलो तर तो वाढेल, पण जनगणना केली तर सर्व गोष्टी समोर येतील. त्यानंतर त्यावर उपाय काय करायचे ते करता येतील. आज भाजप जनगणनेला विरोध करते आहे, परंतु, त्यांच्याच लोकांनी यापूर्वी जनगणनेसाठी पाठिंबा दिला होता. ते आज विसरले आहेत. खरंतर देशामध्ये दरवेळी जातगणना होते. घरोघरी जेव्हा सर्वेक्षण केले जाते, तेव्हा प्रत्येकाची जात नमूद केली जाते, केवळ जनरल (ओपन) लोकांची होत नाही. आता जातनिहाय जनगणना करताना जनरल लोकांची नमूद होईल आणि ते किती टक्के आहेत, हे कळू शकेल.’’
बिहारमध्ये काय झाले ?आता बिहार राज्यामध्ये जातनिहाय जनगणना केली. त्यामध्ये हिंदू व उच्च वर्णीय हे १० टक्के निघाले. मुस्लिम धरून ही टक्केवारी वाढली. पण ८५ टक्के लोकं हे ओबीसी, एससी, एसटीमधील आहेत. तिथली शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्थिती समोर आली. त्यात जे १५ टक्के आहेत, ते अधिक शिकलेले आहेत. तर जे ८५ टक्के आहेत, त्यांच्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. जर अशी गणना बिहार राज्यामध्ये होऊ शकते, तर देशातील कोणत्याही राज्यामध्ये होऊ शकते, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला.
कुठं आजार ते कळेल !आपल्याला आजार झाला तर त्याचा एमआरआय काढला जातो. त्यामध्ये कुठं आजार ते समजते. तसेच जातनिहाय जनगणना केली तर कोण किती आरक्षणाचा लाभ घेते आहे आणि कोणाला किती गरज आहे, ते समजू शकेल. त्यामुळे जनगणना व्हायलाच हवी, असे यादव म्हणाले.
भाजप २०२४ मध्ये हरू शकते !येत्या २०२४ मधील निवडणूकीत भाजप हरू शकते. त्यासाठी ‘इंडिया’कडून चांगल्या प्रकारे लढा देणे आवश्यक आहे. भाजप हरेल, असे मी म्हणत नाही, पण त्यांना हरवता येऊ शकेल, असे मी बोलत आहे. त्यासाठी ‘इंडिया’ने समर्थपणे तोंड द्यायला पाहिजे, असा दावा यादव यांनी व्यक्त केला.
देशात १९-२० टक्केच हिंदू किंवा उच्चवर्णीय असू शकतील. परंतु, न्याय व्यवस्था, उच्च शिक्षण, मीडिया अशा क्षेत्रामध्ये मात्र हेच ८० टक्के लोकं आहेत. आणि जे देशातील ८० लोकं मागास आहेत, ते मात्र या क्षेत्रांमध्ये केवळ २० टक्के दिसतील. हा जातीवाद नाही का? असा सवाल यादव यांनी विचारला.