पुणे : रस्त्यात खड्डे असल्याने पुणेकर त्रस्त आहेत, स्मार्ट सिटी म्हटलेल्या औंध, बाणेर, पाषाण भागात पाणी टंचाई आहे, अशा अनेक समस्या असताना दुसरीकडे पालिका आयुक्त नदी काठ सुंदर करण्यावर कोट्यवधी रूपये खर्च करत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी नागरिकांनी पालिकेसमोर जवाब दो आंदोलन केले. विविध समस्यांचे फलक यावेळी हातात घेऊन पुणेकर सहभागी झाले होते. परंतु आयुक्त विक्रम कुमार मात्र कोणालाही भेटले नाहीत. सामान्य नागरिकांना जर आयुक्त भेटत नसतील तर अशा आयुक्तांची पुण्याला गरज नाही, असा तीव्र संताप नागरिकांनी व्यक्त केला. दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना ताटकळत ठेवण्यात आले होते.
आज सकाळपासून पालिकेसमोर नागरिकांनी जमायला सुरुवात केली आणि आयुक्त तुम्ही समोर या, अशा घोषणा दिल्या. लोकांची गर्दी पाहता ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. नागरिकांना पालिकेत सोडले जात नव्हते. पण नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केल्यावर ते आत गेले. पुणे रिव्हर रिव्हायवल आणि नदीप्रेमी, नागरिक आदींनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी पुणे पालिकेसमोर ऑगस्ट क्रांतीदिनाच्या मुहूर्तावराज सकाळी १० वाजता चलो पीएमसी असे आंदोलन केले. या नागरी चळवळीत सहभागी होऊन सुंदर व स्वच्छ पुणे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्व पुणेकर नागरिककांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नागरिकांना आयुक्तांना भेटायचे होते, पण ते भेटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन निवेदन ठेवण्यात आले. नागरिकांनी खालील समस्या मांडल्या आहेत. तुम्हाला देखील त्या भेडसावत असतील तर या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
तुम्ही टँकरद्वारा पाणी विकत घेता का? नदी किंवा सखल भागात येणाऱ्या पुरामुळे तुम्ही व तुमचे शेजारी बाधित होता का? भविष्यात येऊ घातलेल्या तीव्र हवामान बदलांबाबत तुम्हाला चिंता वाटते का? तुमची मुले आरोग्यपूर्ण असावीत याबद्दल तुम्हांस काय वाटते? स्वछ सुंदर नैसर्गिक अशी आपली नदी असावी असे तुम्हांस वाटते का? नदीमधील जलचरांच्या जगण्याच्या अधिकाराबद्दल आपण काय म्हणाल? ज्या नदीचे पाणी आपण पितो तिचा आपल्याकडून होणाऱ्या अनादराची तुम्हाला चिंता वाटते का? आपणा करदात्यांच्या पैशाचा पुणे मनपाकडून होणाऱ्या वापराविषयी तुम्ही चिंतीत आहात का? वरीलपैकी एकापेक्षा अधिक बाबींवर जर तुम्ही खूणा करत असाल तर तुम्ही पुणे रिव्हर रिव्हायवल या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे आणि पालिकेविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.