पुणे : राज्यातील सरकार फेब्रुवारीनंतरही टिकले तर खासदार संजय राऊत राज्यसभेचा राजीनामा देणार का, असा सवाल राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. फेब्रुवारी जाऊ द्या, १५ मार्चपर्यंत सर्व ताकद, शक्ती वापरा. त्यानंतरही सरकार टिकले तर तुमचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा नकली आहे असे म्हणत जनता तुमचा निषेध करेल, असेही ते म्हणाले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते. राज्यातील सरकार व्हेंटिलेटरवर आहे. हे सरकार फेबुवारी महिना बघणार नाही, असे विधान खा. संजय राऊत यांनी केले हाेते. त्यावर मुनगंटीवार यांनी प्रतिसवाल केला. महाविकास आघाडीने दोन वर्षांत काय दिवे लावले ते सांगावे, असेही ते म्हणाले.सीमावाद ही पंडित नेहरूंची चूक आहे. ती आम्ही भोगत आहे. राज्य सरकार लक्ष घालून ही केस महाराष्ट्राच्या बाजूने सुटावी यासाठी प्रयत्न करत आहेत. विरोधक मात्र सीमावादातून सत्तेपर्यंतचा मार्ग शोधत आहेत, असेही मुनगंटीवार म्हणाले.
नेत्यांनी इतिहासकार होऊ नये
धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक या वादावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लहानपणापासून धर्मवीर संभाजी ऐकले आहेत. राजकीय नेत्यांनी इतिहासकार होऊ नये. निवदेन घेण्यात आपले आयुष्य चालले आहे. गेली १०० वर्षे आपण धर्मवीर म्हणत आहे. त्यामुळे इतिहासकार बनू इच्छिणाऱ्यांना पुस्तके वाचण्यासाठी जनतेनेच वेळ उपलब्ध करून द्यावा, असा टोलाही त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
चित्रपट अनुदानासाठी तातडीने समिती
राज्यातील २०४ चित्रपटांचे अनुदान रखडले आहे. अर्ज आल्यापासून तीन महिन्यांत अनुदान दिलेच पाहिजे, असा नियम केला जाणार आहे. अनुदानासाठी अ, ब, क असे तीन वर्ग असतील. संकल्पनांवर (थीम) आधारित चित्रपटांना अनुदान, सामाजिक चित्रपट कथा यांना विशेष अनुदान दिले जाईल. राष्ट्रीय पुरस्कार मिळणाऱ्या मराठी चित्रपटाला दुप्पट अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.