राजगुरूनगर : शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर माजी खासदार शिवाजी आढळराव हेच जबाबदार राहतील. खेडपोलिस ठाण्यात आढळराव यांनी खोटा गुन्हा दाखल केला म्हणून शिवसैनिक (दि. २१ ) रोजी आक्रमक होऊन खेड पोलीस ठाण्यात आंदोलन करून आढळरावाचा निषेध केला. तसेच शिवसैनिकावर झालेले खोटे गुन्हे पाठीमागे घ्यावेत याबाबत पोलिसांना निवेदन दिले.
शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटात सामिल झाल्याने यांचा राजगुरूनगर येथे महामार्गावर पुतळा जाळून अश्लिल भाषेत शिवीगाऴ केली. आढळराव यांचा फोटो गाढवाच्या चेह-याच्या ठिकाणी लावुन त्यावर चप्पलने मारुन चप्पलाचा हार घातला. तसेच लांडेवाडी येथील राहत्या घरी येवुन हात पाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी १७ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आढळराव यांनी खोटी फिर्याद देऊन शिवसैनिकांची बदनामी केली.
या घटनेने शिवसैनिक आक्रमक होऊन थेट खेड पोलीस ठाण्यावरती वाजत - गाजत निषेध मोर्चा काढून पोलिसांना घेराव घातला. शिवसैनिकांनी आढळराव यांचे लांडेवाडी येथील घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी दिल्याची खोटी तक्रार आहे. अशी खोटी तक्रार देऊन तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांची बदनामी केलेली असून गुन्हे दाखल झालेल्या शिवसैनिक पदाधिकारी यांना मारहाण, धमकी, शिवीगाळ व जीवास धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आढळराव पाटील यांच्यावर राहिल. असा इशारा देत खेड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
यावेळी यावेळी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा समन्वयक अॅड. गणेश सांडभोर, माजी तालुकाप्रमुख सुरेश चव्हाण, शंकर दाते, अमोल विरकर, तुषार सांडभोर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.