पुणे : काँग्रेस नेत्यांच्या ‘बंडखोरी करू नका’ या विनंतीला नकार देत बाळासाहेब दाभेकर यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत बंडखाेरी केली आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती, मात्र पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली. सलग ४० वर्षे काम करत असूनही पक्ष विचार करत नसेल तर मग असा निर्णय घेण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, असे दाभेकर यांनी सांगितले.
त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीपूर्वी त्यांनी नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरात जाऊन पूजा केली. केसरी वाड्यात जाऊन शैलेश टिळक यांचीही भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत मिरवणुकीने गणेश कला, क्रीडा मंदिरातील निवडणूक निरीक्षक कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीबरोबरच इतर पक्षांचे अर्ज दाखल झाले आहेत. पण दोन्हीकडे बंडखोरी झाली असून दोन नेत्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. कसब्यातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. तर चिंचवडमधून राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतांचा फायदा कोणाला होणार यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
मी माघार घेणार नाही
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता. मी त्यांना स्पष्ट सांगितलं कि, मी कसबा पोटनिवडणूक लढवणारच आहे. आता मी माघार घेणार नाही. आता मी काँग्रेस भवनातही जाणार नाही. हा निर्णय मी पक्षाला देखील कळवला असल्याचे दाभेकर यांनी सांगितले आहे.