पुणे: दिवगंत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी पुणे शहर लोकसभेची रिक्त जागा लढवण्याबाबत आपली तयारी असल्याचे सांगितले. गुरूवारी (दि.१८) पुण्यातच होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्वरदा यांनी हे वक्तव्य केले आहे. या जागेसाठी भाजपतच रस्सीखेच सुरू असून त्यामध्ये आता स्वरदा यांच्या नावाची भर पडली आहे.
गिरीश बापट पुणे शहराचे भाजपचे सर्वेसर्वा होते. नगरसेवकपदापासून सुरू झालेली त्यांची कारकिर्द थेट खासदारपदापर्यंत पोहचली. खासदार असतानाच त्यांचे २९ मार्च रोजी आजारपणामुळे निधन झाले. तेव्हापासून रिक्त झालेल्या या जागेसाठी भाजपतच अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र बापट यांचे कुटुंबीय त्यापासून लांब होते. आता ऐन बैठकीच्या पाश्वभूमीवर स्वरदा यांनी लोकसभा निवडणुक लढण्याची तयारी दर्शवल्यामुळे भाजपच्या वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे.
लोकमत बरोबर बोलताना स्वरदा म्हणाल्या, पक्ष ठरवेल ते मला मान्य आहे. मी सांगली महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. विवाहानंतर बापट यांच्या घरात आल्यावर आता शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. पक्षाने लोकसभेसाठी संधी दिली तर माझी तयारी आहे. मात्र पक्ष ठरवेल तो निर्णय मला मान्य असेल. पक्षादेशच माझ्यासाठी अंतीम आहे.
दरम्यान या जागेसाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भाजपतील अनेकांनी साकडे घातले आहे. पिपंरी- चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनीही पुण्यावर आपले प्रेम असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे पुणे शहर लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारीस मुक संमती दिल्याचे त्यांचे पुण्यातीस समर्थक सांगत आहेत. त्याशिवाय माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचेही नाव यासाठी आघाडीवर आहे.