कात्रज : दक्षिण पुण्यातील आंबेगाव बु.येथे अनेक छोट्यामोठ्या सोसायट्या,शाळा, कॉलेज,जवळ असताना खुले आम वेश्या व्यवसाय सुरू आहे. कात्रज कडून नवले पुलाकडे जाताना खुले आम वेश्या व्यवसाय सुरु आहे. अभिनव शाळे पुढे स्पेलंडर रेसिडेन्सी, लोटस रेसिडेन्सी, मोक्षांगण सोसायटी, सारख्या सोसायट्या आहेत गजबजलेल्या भागात या वेश्या उघडपणे उभ्या असतात. यामुळे सर्वसामान्यांची मोठी कुचंबणा होत आहे. तसेच आसपास काम करणाऱ्या व येजा करणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
घरामधून कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिला असतील किंवा कामाला जाणाऱ्या महिला असतील त्या स्कार्प बांधून रिक्षा किंवा बस साठी उभ्या असतात अशा महिलांचीच काही नागरिकांकडून वेश्या समजून विचारणा होते. त्यामुळे सोसायटी मधील महिलांना तसेच परिसरातील महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात सोसायटीतील महिला व नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देखील दिल्या आहेत. यावर कोणत्याही प्रकारचे उपाययोजना होत नसल्याने नागरिकांकडून मनसेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांना ही बाब सांगितली. त्यावरून आज महिला व नागरिकांच्या उपस्थितीत वसंत मोरे यांनी हॉटेल चालकांना निवेदने दिली. यापुढे अशा प्रकारचा व्यवसाय चालत असेल तर मनसे स्टाईलने खळ खट्याक करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी मनसे नेते वसंत मोरे, मंगेश रासकर, मनसेचे कात्रज मधील पदाधिकारी,मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. या भागातील अडीच ते तीन हजार फ्लॅट धारकांना यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा पोलिसांना तक्रारी करून देखील यावर काहीच कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापुढे जर असा प्रकार आढळला तर...
या भागामध्ये अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती महिलांकडून मिळाली. त्या अनुषंगाने संबंधित लॉजधारकांना निवेदन दिली आहेत. यापुढे जर असा प्रकार आढळला तर मनसे स्टाईलने खळ खटक करण्यात येईल. त्याचबरोबर या भागातील रस्त्यावरील स्ट्रीट लाईट देखील बंद आहेत. त्या चालू करण्यासाठी देखील मनपाला सांगण्यात येईल.- वसंत मोरे,माजी नगरसेवक पुणे मनपा.
...त्यामुळे सोसायटीतील महिलांना खूप त्रास
मागील दोन ते तीन वर्षांपासून महिलांना खुप त्रास होत आहे, यासंदर्भात वेळोवेळी अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केला परंतू यावर काहीच कार्यवाही होत नाही . आम्हाला सर्व महिलांना इथे राहणेच अवघड झाले आहे. मोठया प्रमाणात महिला इथे थांबतात त्यामुळे सोसायटीतील महिलांना खूप त्रास होत आहे. - महिला , स्प्लेंडर रसिडेन्सी.
पोलिसांकडून त्या ठिकाणी वारंवार गस्त
भारती विद्यापीठ पोलिसांकडून त्या ठिकाणी वारंवार गस्त घालण्यात येते. त्याचबरोबर आम्ही हॉटेल चालकांना तशा नोटीसा देखील दिल्या आहेत. हॉटेल चालक व महिलांवरती आम्ही खटले देखील दाखल केले आहेत. सतत कारवाई चालू असते. मनपाने अगोदर रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावाव्यात.- विजय कुंभार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन.