पुणे : वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन घटना मुंढवा आणि हडपसर परिसरात घडल्या आहेत. पहिल्या घटनेमध्ये, मुंढवा परिसरात राहणाऱ्या अभिषेक उदिया (वय ३८) यांनी सायबर पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदिया यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पार्ट टाइम नोकरीसाठीचा मेसेज आला. वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास त्याचा चांगला परतावा मिळेल असे सांगून उदिया यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगत तब्बल ११ लाख १८ हजार रुपये उकळले. काही कालावधी उलटल्यानंतर नफ्याचे पैसे मिळत नसल्याने विचारपूस केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दुसऱ्या घटनेमध्ये, हडपसर परिसरात राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने वानवडी पोलिसांना फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेला टास्क पूर्ण केल्यास चांगले कमिशन मिळेल असे आमिष दाखवून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यांनतर प्रीपेड, व्हीआयपी टास्कच्या नावाखाली पैसे उकळून महिलेची ३ लाख १३ हजरांची फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.