पुणे : लांबणारा पावसाळा आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका या गुरुवारपासून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. त्यासाठी महापालिकेने २० ठिकाणी एअर वॉल बसविले असून, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच शुक्रवारी आणि शनिवारी काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची विनंती महापालिका आयुक्तांना ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
सुळे म्हणाल्या, पुणे महापालिकेत समाविष्ट धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसनगर अशा गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच महापालिकेने एक पत्रक जारी करुन दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले आहे.नागरीकांना ही अस्वस्थ करणारी बाब आहे. अगोदरच अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरीक हैराण आहेत. त्यात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. महापालिका पुणे आयुक्तांना विनंती आहे की कृपया नागरिकांच्या सोयीसाठी समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा पुर्ववत सुरु ठेवावा.
दरम्यान एलनिनो वादळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यासोबतच आवश्यक तिथे पाणी कपात करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका १८ मे पासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. पुणे शहरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी एका दिवशी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरिक त्रासून जातात. अशा भागात प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करणार, हा कळीचा मुद्दा आहे.