सचिन वाघमारे
पिंपरी : मावळ तालुक्यात वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २५ शाळा आहेत. यापैकी मावळ तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या एका शाळेत जाऊन पाहणी केली असता या शाळेत १२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी तीन वर्गांत प्रत्येकी दोनच विद्यार्थी आहेत, तर दुसरीमध्ये सहा विद्यार्थी आहेत. या वर्गातील दोनच विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील खांडी, चावसर, माळेगाव केंद्रातील काही शाळांची पटसंख्या कमी आहे. या ठिकाणी शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहेत. एका वर्गात दोनच विद्यार्थी आहेत. त्यापैकी एक जण आला नाही तर काही वेळा एकलाच शिकवावे लागते, तर काही वेळा एकत्र शिकवण्यासाठी दोघेही शाळेत येण्याची वाट पाहावी लागते.
मावळ तालुक्यात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या २५ शाळा
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या २५ शाळा आहेत. तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या खांडी, चावसर, माळेगाव केंद्रातील काही शाळा एक शिक्षकी आहेत.
विद्यार्थी संख्येनुसार पद निर्मिती
विद्यार्थी संख्येनुसार पद निर्मिती केली जाते. पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांसाठी १ ते ६० विद्यार्थी असल्यास २ शिक्षक, ६० पेक्षा पटसंख्या जास्त असल्यास तीन शिक्षक तर १५० पटसंख्या असल्यास पाच शिक्षक असतात. तर सहावी ते आठवीसाठी ३५ विद्यार्थी असल्यास १ शिक्षक तर ७० पटसंख्या असल्यास दोन शिक्षक तर १७५ पटसंख्या असल्यास पाच शिक्षक असतात.
तालुक्यात २० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या २४९ शाळा
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण प्राथमिक शाळा २७४ असून त्यापैकी २४९ शाळाची पटसंख्या २० पेक्षा अधिक आहे, तर मावळ तालुक्यात ६७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
''कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिकवताना तारेवरची कसरत करावी लागते. एक जण शाळेत आला व दुसरा आला नाही तर अभ्यासात खंड पडतो. कधी कधी दोघे एकत्र येण्याची वाट पाहवी लागते. - एक शिक्षक''