पुणे : पुण्यात आज गृहमंत्री अमित शाह दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संवाद मेळाव्यात भाषण करताना अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ''महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन दोन दोन हात करा आम्ही घाबरत नाही. भाजप एकटे लढा देईल असे आव्हान देत हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा असे ते यावेळी म्हणाले आहेत.''
''महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ठरले होते. तरीही, उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वासाठी तडजोड केली. ज्यांच्याशी लढायचे, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि भाजपशी विश्वासघात केला, असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केला. हिंमत असल्यास राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी
महाआघाडी सरकारच्या अध:पतनाची सुरुवात आता व्हायला हवी. महासंपर्क अभियानातूनच आपण निवडणुका जिंकू आणि त्याची सुरुवात पुण्यापासून व्हायला हवी. तुमच्या नेतृत्वाने तुमची मान खाली जाईल, असे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने, निधड्या छातीने, निर्भयतेने आणि विवेकाने मतदारांसमोर जा. लक्ष्य उंच ठेवा, जनता खूप द्यायला तयार आहे, मागताना संकोच करू नका’, असा कानमंत्रही त्यांनी दिला.
कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो
अमित शहा यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘माझ्या कारकिदीर्ची सुरुवात बूथ अध्यक्ष म्हणून झाली. बुथचा अध्यक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच घडू शकते. पक्षात जो मागत नाही, त्याला न मागताच सगळे काही मिळते. हा नेत्यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तेच पक्षाचे भविष्य आहे. कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो.’