पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमेनिमित्त पोस्ट केल्या होत्या. त्यामध्ये वडाचे संवर्धन करावे, वडाच्या पूजेमागचा वैज्ञानिक विचार जाणून घ्यावा असे विषय मांडण्यात आले होते. पण त्या पोस्टवर काही विकृत मंडळींनी आक्षेपार्ह टीका केली आहे. महिलांना न्याय देणारे राज्य महिला आयोगाच्या पदाचाही या मंडळींना भान नसल्याचे दिसून येत आहे. त्यावरच सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले आहे. काही जणांनी एक महिला म्हणून अत्यंत अश्लील शेरेबाजी केली आहे. घटनात्मक पदावर असलेल्या एका महिलेवर की जी कायदेशीर कारवाईची शिफारस करू शकते अशा महिलेवर जर असे लिहिण्याची हिंमत होत असेल तर इतर महिलांवर सोशल मिडीयावर काय होत असेल याची कल्पना यावी असे त्यांनी पत्रातून म्हंटले आहे.
''तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात परंतु वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही जी पोस्ट लिहिली त्यावर काहीजणांनी एक महिला म्हणून अत्यंत अश्लील शेरेबाजी केली आहे. घटनात्मक पदावर असलेल्या एका महिलेवर की जी कायदेशीर कारवाईची शिफारस करू शकते. अशा महिलेवर जर असे लिहिण्याची हिंमत होत असेल तर इतर महिलांवर सोशल मिडीयावर काय होत असेल याची कल्पना यावी. मागील आठवड्यात अमृता फडणवीस यांनी वेश्याव्यवसायावर मत मांडले (की जे मला अजिबात मान्य नाही)त्यावर ज्या नीच भाषेत शेरेबाजी झाली व आता तुमच्यावर शेरेबाजी झाली. तेव्हा हा विषय व्यक्तिगत न समजता सायबर सेलकडून अमृता फडणवीस व तुम्ही अशा दोघींवर झालेल्या सर्व कमेंट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत त्यातून पुन्हा अशी हिंमत कोणी करणार नाही. एका घटनात्मक पदावर असलेल्या महिलेबाबत असे अश्लील कमेंट करूनसुद्धा जर कारवाई झाली नाही तर इतर महिलांना सोशल मिडीयावर लिहिणेच मुश्कील होईल हे लक्षात घेऊन तत्काळ कारवाया सुरु कराव्यात अशी विनंती कुलकर्णी यांनी पत्रातून केली आहे.''
रुपाली चाकणकर यांनी केलेले ट्विट