पुणे - पुण्यात लोकसभा निवडणुकीवरून उलट-सुलट चर्चा सुरू असून, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपा-शिवसेनेची युती न झाल्यास याचा परिणाम पुण्यात देखील होऊ शकतो, असे मत भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, निवडणुकीत आपल्या विरोधामध्ये कोण आहे, यापेक्षा मी नेहमीच विकासकामाला महत्त्व दिले असून, अखेरच्या क्षणापर्यंत आपले काम सुरुच असते, असे शिरोळे यांनी स्पष्ट केले.केंद्रात मोदीसरकारला ४ वर्षे पूर्ण झाली. या सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या विविध कामांचा, विविध योजनांचा व केंद्र शासनाच्या माध्यमातून पुण्याच्या विकासासाठी केलेल्या कामगिरीची आढावा घेण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना भाजपा-सेनेच्या युतीबद्दल सांगितले. दरम्यान, पुण्याची लोकसभेची जागा गेल्या काही वर्षांत युती आघाडीमध्ये भाजपा आणि काँगे्रस लढवत आहे. परंतु, यावेळी परिस्थिती बदलली असून, शिवसेने-भाजपाच्या युतीमधील मतभेद प्रचंड वाढले आहेत. यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती होईल किंवा नाही, याबाबत अद्याप तरी काहीच स्पष्ट सांगता येत नाही. तर काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसमध्येदेखील पुण्याच्या जागेवरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर दावा सांगितला जात आहे. याबाबत शिरोळे यांना विचारले ते म्हणाले, काँग्रेसला ही जागा मिळाली तर मोहन जोशी उमेदवार असू शकतात़ मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण असेल हे सांगता येत नाही़ भाजपा-शिवसेनेची युती न झाल्यास त्याचा परिणाम पुण्यातही होऊ शकतो़, असे त्यांनी सांगितले़
युती न झाल्यास पुण्यातही परिणाम होऊ शकतो - अनिल शिरोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 3:40 AM