लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत काही कमी-जास्त घडले असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी. त्या चौकशीला कोणाचाही विरोध असता कामा नये. राठोड जर चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी,’ अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली आहे.
शुक्रवारी (दि.२६) ते पत्रकार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले की, हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. येथे स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे. पूर्वीच्या सरकारच्या काळातील मंत्र्यांवर असेच आरोप झाले होते. आत्ता राजीनामा मागणाऱ्यांची तेव्हा काय भूमिका होती, याही प्रश्नाचे उत्तर द्यावे.
शेतकरी आंदोलन आणि अदानी-अंबानी या उद्योगपतींबद्दल बोलताना शेट्टी यांनी सांगितले, की तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. केंद्र सरकारला यावर मार्ग काढणे नामुष्कीजनक वाटत असावे. आतापर्यंत अडीचशे शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे. सरकारने लादलेले तीन कृषी कायदे सामान्य माणसावरही परिणाम करणारे ठरणार आहेत. शेतकरी लुटला जाऊ नये, या भूमिकेतून बळीराजा आंदोलन करतोय. यात पुढे आलेले दोन नामधारक म्हणजेच अदानी-अंबानी होय. यापैकी अंबानीच्या घरासमोर स्फोटके सापडतात. म्हणजे नेमके हे घडवून आणले आहे का? त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी घडवलेले हे षडयंत्र असल्याचे माझे ठाम मत आहे. ही स्फोटके मुंबईत येत असताना गुप्तचर यंत्रणा, पोलीस, रॉ काय करत होती. मग आमची मुंबई सुरक्षित नाही का? सीबीआयने बाकी राजकीय कामांपेक्षा याकडे लक्ष द्यावे. अशी स्फोटके घराजवळ आणून अंबानींना सहानुभूती मिळेल असे त्यांनी अजिबात समजू नये, असे शेट्टी म्हणाले.