बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं; अजित पवारांचे विधानसभा न लढविण्याचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 05:17 PM2024-09-08T17:17:44+5:302024-09-08T17:18:00+5:30
कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे, मग तुम्ही १९९१ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या कामांची त्याच्याशी तुलना करा
बारामती : एवढी कामं करूनही बारामतीत असं होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. कारण लाखानं निवडून येणारी आपण माणसं. जर बारामतीत असं होणार असेल तर उभं न राहिलेलं बरं, अशा शब्दात विधान सभा निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले आहेत.
बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पवार पुढे म्हणाले, काम करुनही अशी गंमत होणार असेल तर मग झाकली मूठ सव्वा लाख रुपयांची राहिलेली बरी. मी आता ६५ वर्षांचा झालोय. मी तसा समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एकदा काय झालं पाहिजे. कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे. मग तुम्ही १९९१ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या कामांची तुलना करा, असे आवाहन देखील पवार यांनी केले.
पवार म्हणाले, बारामतीकरांच्या नादाला लागायचं काम नाही. बारामतीकरांना शिकवायला जाऊ नका मला उडवून लावलं तर तुमचं काय? असे पवार म्हणाले. पवार साहेबांनी कधी अर्थ खाते स्वतःकडे ठेवलं नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदासह अनेक पदं भूषवली. मंत्रिपद माझ्याकडे आल्यानंतर मी अर्थ खातं घेतलं आणि त्यामध्ये निधी कसा आणता येईल याचा विचार केला. अर्थ खात्यावर कुणीतरी काहीतरी बोललं, बोलणाऱ्यांना बोलू द्या तुम्ही त्यात लक्ष घालू नका आम्ही तिकडे बघू, असं अजित पवार म्हणाले.
मला अनेक कामं करायची आहेत. करायचं की नाही करायचं, हे तुमच्या हातात आहे. मी पण माणूस आहे. इतकं करूनदेखील मला हे बघावं लागत असेल, जिथे मी दुसऱ्याला खासदार, आमदार करतो तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी, असे पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा पराभवाची सल अजुन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात अजुनही असल्याचे या निमित्त्ताने स्पष्ट झाले आहॆ .पवार यांनी विधानसभा निवडणुकीला न उभे राहण्याचे संकेत दिले.यावेळी कार्यकर्ते यांनी गोंधळ केला.दादा तुम्ही स्वतः उभे राहा,दादा काहीही करा पण तुम्हीच उभा राहा कार्यकर्त्यांचा सल्ला,अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
मागील आठवड्यात खासदार सुनील तटकरे बारामतीत आले होते. ते म्हणाले, बारामतीचे तुम्ही हे काय केले आहे? काम केलं तरी असं कसं होतं? मी म्हणालो, मला माहिती नाही, काम करायचं आपल्या हातात आहे.निवडून द्यायचं लोकांच्या हातात,असे अजित पवार म्हणाले.