पुणे: ‘भारतात भारत माता की जय म्हणावेच लागेल, भारत माता की जय म्हणणारेच लोक देशात राहतील. तसेच जो येईल तो येथेच राहणार आहे का? भाारताला आपण धर्मशाळा करणार आहोत का ? याचा विचार करावाच लागेल.’असे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी शनिवारी केले.
अखिल भारतीय विद्याार्थी परिषदेच्या (अभाविप) ५४ व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी प्रधान बोलत होते. कार्यक्रमास पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, प्रदेश प्रमुख डॉ. प्रशांत साठे, महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष प्रा. सारंग जोशी, ज्येष्ठ उद्योजक प्रमोद चौधरी,अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव राजेश पांडे, पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे आदी उपस्थित होते.
नागरिकत्व कायद्यााला होत असलेल्या विरोधावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना धर्मेद्र प्रधान म्हणाले, देशाचे तुकडे करणाऱ्या कंपूकडून नागरिकत्व कायद्याला, नागरिकत्व नोंदवहीला देशभरातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांतून विरोध केला जात आहे. नागरिकत्व कायद्याबाबत विनाकारण प्रश्न उपस्थित करून अपप्रचार केला जात आहे.जगातील सर्व देशांमध्ये नागरिकत्व कायदे लागू असून काही देशांमध्ये तर, शासनाला याबाबत प्रश्नही विचारता येत नाही.परंतु, देशामध्ये बौद्धिक ठेकेदारी आपल्याकडेच आहे, असे काहींना वाटते. या लोकांकडून कायद्याबाबत प्रश्न विचारण्याची हिंमत कशी होते? याबाबत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याची आवश्यकता आहे.
गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांनी शारीरिक आव्हानांवर मात करत एव्हरेस्ट शिखर कसे सर केले याबाबतचा अनुभव विद्याार्थ्यांना सांगितला.तसेच सध्यस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसमोर स्वत:च्या आव्हानांचे एव्हरेस्ट आहे.परंतु, प्रत्येकाने स्वत:समोर एक लक्ष्य ठेवून लक्षपूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,असेही सिन्हा यांनी यावेळी नमूद केले.