जेजुरी : देशात शेतकऱ्यांची संमती नसेल तर शासनाला कोणाच्याही शेतजमिनी घेता येऊ शकत नाहीत. जेजुरी औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी जेजुरी परिसरातील मावडी, कोळविहीरे व नावळी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने शिक्के मारले आहेत. आजी व माजी आमदारांनी यापूर्वी येथे स्वस्तात जागा घेऊन ठेवल्या आहेत. शासन, लोकप्रतिनिधी, उद्योजक यांच्याविरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे. गावकऱ्यांची एकजूट असेल तर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन हभप बंडातात्या कऱ्हाडकर यांनी केले.नावळी येथे यासंदर्भात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी मावडी, कोळविहीरे व नावळी येथील शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवदेन कऱ्हाडकर यांना दिले. या वेळी कऱ्हाडकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्यात एकजूट असेल तर आंदोलनाबरोबरच कायद्याचीही लढाई करून न्याय निश्चित मिळतो. नीरा येथील जुब्लियंट कंपनी विरोधातला लढा, तळेगावजवळील नवलाख उंबरे, चाकण विमानतळ लढा, पेरणे फाटा टोल नाका लढा हा एकजुटीचा विजय आहे. जेजुरी एमआयडीसीमध्ये पहिलेच प्लॉट रिकामे असताना केवळ स्वार्थासाठी पुढाऱ्यांनी पाचव्या टप्प्याचा आग्रह धरला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतजमिनींवर आरक्षण टाकले आहे. याला शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून विरोध दर्शविला आहे. मावडी गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाला गावकऱ्यांची एकजूट दाखवून दिली आहे. एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे, दुसरीकडे शासन औद्योगिक क्रांतीच्या नावाखाली प्रचंड प्रदूषण वाढवीत आहे. येथे शेतीला पाणी हवे आहे ते द्या.’’जोपर्यंत येथील शेतजमिनींवरील शिक्के शासन काढत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. माझा व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचा या आंदोलनाला पाठिंबा राहील, असे कऱ्हाडकर यांनी सांगितले.या वेळी गेनबा म्हस्के, छबन म्हस्के, सुनील गिरमे, भाग्यवान म्हस्के, बाळासाहेब गांजुरे, चंद्रकांत भामे, सुरेश निकम, तसेच नावळी, मावडी व कोळविहीरे येथील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
एकजूट असेल तर जमिनी वाचतील
By admin | Published: March 06, 2016 1:09 AM