बारामती : वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केल असत तर आम्ही चांगले ,पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो तर बेकार झालो. पक्ष चोरल्याचा आरोप होतो. निवडणुक आयोगाने, विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली. आमची बदनामी का करता, असा सवाल अजित पवार यांनी केला. वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रीय अध्यक्ष झालो असतो. पक्ष ताब्यात आला असता. तुमच्या सख्या भावाच्याच पोटी जन्माला आलो ना, अशा शब्दात अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
बारामती येथे आयोजित बुथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आम्ही पवार कुटुंबिय एकच आहे, असा कोणाच्या मनात संभ्रम नको. आता आमच्या घरातील एकमेव ते वरिष्ठ आहेत. दुसरे वरीष्ठ पुण्याला असतात. कदाचित मी आणि माझा परिवार साेडल्यास सगळे कुटुंबिय माझ्या विरोधात प्रचार करतील. घरातले सगळे माझ्या विरोधात गेले तरी तुम्ही माझ्याबरोबर आहात. जीवाच रान करुन देखील एकट पाडतात, अशा शब्दात अजित पवार काैटुंबिक भुमिका स्पष्ट केली.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार भावनावर झाल्याचे पहावयास मिळाले.
आमची बदनामी केली, आमची चाैकशी थांबावी म्हणुन आम्ही ती राजकीय भुमिका घेतल्याचे सांगतात. काहीजण माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नसल्याचे सांगतात. तुम्ही कधी मंत्रीच नव्हता, तर भ्रष्टाचाराचा आरोप होइल कसा, जो काम करतो त्याच्यावरच आरोप होतो. काहीजण रात्री १० वाजता गाड्यावर चहा प्यायला जातात. १७ वर्षांनी चहा प्यायच आठवल का, गाड्यावर येवुन चहा पिणे चांगले का, विकासकामासाठी वेळ देण चांगले,अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी खासदार सुळे यांना टोले लगावले.