पुणे : स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं. तरच सुराज्य आलं असं म्हणता येईल. पैशानेचं सगळी कामे पार पडली जातात ही धारणा संपली पाहिजे. तसेच देशातून जातपात संपुष्टात आली पाहिजे. जातीवादाच्या पलीकडं जाऊन अन् एकमेकांना बरोबर घेऊन काम केल्यास देशाचा विकास होईल असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.
कोव्हिड काळात विविध संस्था - संघटना आणि वैयक्तिक पातळीवर देखील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सर्वसामान्य व्यक्ती पासून ते उच्चपदस्थ व्यक्तीपर्यंत सर्वांचाच यात समावेश होता. या कठीण काळात दाखविलेल्या एकजुटी मुळेच आपण हे संकट परतावून लावू शकलो आहोत. अशाच एकजुटीच्या बळावर जातीभेदाच्या श्रृखंला गळून समतेचे राज्य प्रस्थापित व्हावं असंही ते म्हणाले.
पुण्यातील अशाच काही सेवाव्रती व्यक्तींचा आणि संस्थांचा पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फौंडेशनतर्फे भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
मोदींमुळे देशाप्रती विदेशात राहाणा-या भारतीयांचा अभिमानाने उर भरून येतो
''ज्यांचे हदय मोठं असतं तेच ख-या अर्थाने मोठे असतात. मग ते सामान्य व्यक्ती असोत किंवा उच्चपदस्थ व्यक्ती असोत. सर्वांचे काम मोठे आहे. जे निष्पाप आणि निष्कलंक आहेत ते समर्पण भावनेने सेवा देत असतात. हा सेवाभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रूजविला. मोदी यांनी सदैव दुस-यांचे दुःख, वेदना जाणून घेत धोरणांची आखणी केली. त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणा-या स्वच्छता, शौचालय, वीज, अशा मुलभूत समस्यांना हात घातला. ज्या नागरिकांनी पिढ्यान पिढ्या बँकेची पायरी चढली नव्हती अशांचे जनधन योजने मार्फत बँकेशी संबंंध जोडून दिले. सरकारमध्ये कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही ही प्रस्थापित झालेली धारणा मोदी सरकार आता खोडून काढत आहेत. मोदी यांच्यामुळेच देशाप्रती विदेशात राहाणा-या भारतीयांचा अभिमानाने उर भरून येतो. देशातून जातपात हददपार झाली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.''
हे रबर स्टॅम्प राज्यपाल नाहीत - चंद्रकांत पाटील
''महाराष्ट्राला लाभलेले राज्यपाल हे रबर स्टॅम्प राज्यपाल नसून, ते त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धी ला जागृत ठेवत त्यांना योग्य वाटतील तेच निर्णय घेतात. कोणी कर म्हणून सांगितले म्हणून ते करीत नाही. उलट कोणी सांगितले की कर असे म्हटलं तर ते मुळीच करीत नाहीत. त्यांचे काम रात्री बारापर्यंत सुरूच असते, अशी मिश्कील टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी करताच सभागृहात हशा पिकला. राज्यपालांना शेलकी विशेषणे लावली गेली. त्यांच्यावर टीका झाली तरी ते आनंदाने पुढे मार्गक्रमण करीत राहातात. नकारात्मक गोष्टींपासून पळून जायचे नाही हे राज्यपालांकडून शिकायला मिळाले, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांवर स्तुतीसुमने उधळली.''