पिंपरी : संचारबंदी असतानाही लोणावळ्यात पर्यटकांकडून गर्दी होत आहे. पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. अन्यथा पोलिसांना दंडुका उगारावा लागेल, असा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडेय यांनी दिला.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पांडेय बाेलत होते.
पांडेय म्हणाले, लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी वाढतच आहे. संचारबंदी, जमावबंदी तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून काही पर्यटक गर्दी करीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यांच्याशी काही जण वाद घालत आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करीत आहेत. पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. अन्यथा पोलिसांना त्यांचे हत्यार बाहेर काढावे लागेल. नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
‘तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याची चूक टाळा’गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, काही देशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे. आपल्याकडे देखील तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. देश पातळीवरील टास्क फोर्सचे मेंबर व तज्ज्ञ व संबंधित संस्थांनी जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर अनावश्यक गर्दी करू नये. तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याची चूक आपल्याकडून घडू नये, याची खबरदारी घ्यावी, तसेच कोरोना निर्बंधांचे पालन करावे. अनेक दिवस लोकांना घरात रहावे लागते. मात्र असे असले तरी नागरिकांनी विनाकारण तसेच पर्यटनासाठी घराबाहेर पडणे उचित नाही. पर्यटकांनी याबाबत काळजी घेतली पाहिजे.
गृहमंत्र्यांची आयुक्तालयातील पहिलीच आढावा बैठकपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी पहिलीच आढावा बैठक झाली. गृहमंत्री झाल्यानंतर वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती.
‘डीजी लोन’बाबत निर्णयपोलिसांना घरासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र सध्या ही सुविधा बंद आहे. त्याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडेय म्हणाले, काही तांत्रिक अडचणींमुळे डीजी लोनमध्ये अडथळे येत आहेत. मात्र शासन स्तरावर याबाबत चर्चा झाली असून कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे काही महिन्यांतच ही सम्या सुटून पोलिसांना डीजी लोन उपलब्ध होणार आहे.