पुणे : घरातील महिला सक्षम असेल तर कुटुंबासह देशदेखील सक्षम होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कोथरूड येथे व्यक्त केले. किरण दगडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला सशक्तीकरणासाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षणाचा प्रारंभ, हळदी- कुंकवाचा कार्यक्रम, स्वच्छ पुणे सुंदर पुणे- हसरे पुणे उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कोथरूड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष साहित्य देऊन यावेळी गौरव करण्यात आला.अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रेरणादायी मार्गदर्शनाने आणि कौतुकाच्या शब्दांनी आमच्या समाजोपयोगी उपक्रमांना नवी दिशा आणि बळ दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यवसाय प्रशिक्षण आणि हास्ययोग उपक्रम यासारख्या लोककल्याणकारी उपक्रमांवर दाखविलेला विश्वास हा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आमचे पाऊल नवनिर्मितीच्या दिशेने आणखी ठाम झाले आहे असे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.यावेळी अभिनेत्री, लेखिका तसेच दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडे, सूर्यदत्ता कॉलेजचे संजय चोरडिया, सुषमा संजय चोरडिया, नवचैतन्य हास्य क्लबचे संस्थापक विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, बावधनच्या माजी सरपंच पीयूषा किरण दगडे पाटील, आदी उपस्थित होते.
महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम होईल : अमृता फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:54 IST