पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू असून, त्यात शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्यास त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच त्यांना बदल्यांच्या प्रक्रियेतूनही बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. राज्य सरकारने याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत.
राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक जारी केले आहे. या बदल्यांचे आदेश शनिवारी (ता. १३) काढण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया राबविताना २ व ३ ऑगस्ट या कालावधीत शिक्षकांची बिंदुनामावली (रोस्टर) अपलोड करण्यात आली. तर ६ व ८ ऑगस्ट दरम्यान शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, काही शिक्षकांनी संबंधित संवर्गाची पात्रता धारण केलेली नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरल्याच्या तक्रारी आल्या होत्या. अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे शिक्षकांच्या बदल्या झाल्यास संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांवर अन्याय होणार होता.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना-हरकत प्रमाणपत्रधारक शिक्षक आणि विशेष संवर्ग शिक्षक यात अर्ज केलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्राआधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात येणार आहे. तसेच संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात येणार आहे. मात्र, आता बदल्यांसंदर्भात ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची मुदतही संपल्यामुळे या शिक्षकांना नव्याने अर्ज करण्याची मुभा राहणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.