उरुळी कांचन : शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल, तर फडणवीस सरकारने राजीनामा देऊन सत्ता सोडावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी व राज्य शासनाने तुरीची खरेदी तातडीने सुरू करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी सुळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २७) सकाळी पुणे-सोलापूर महामार्ग उरुळी कांचन येथे रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी भाजपा सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, संचालक सुरेश घुले, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, पंचायत समिती सभापती वैशाली महाडिक, उपसभापती अजिंक्य घुले, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, सुनंदा शेलार, कल्पना जगताप, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, कावेरी कुंजीर, युगंधर काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘आठवड्यामध्ये सरकारने कर्जमाफीवर निर्णय न घेतल्यास शेतकरीहितासाठीचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. सुरुवातीला पालकमंत्र्यांच्या गाड्यांना घेराव घालण्यात येईल. त्यानेही प्रश्न सुटला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या गाडीला अडवून जाब विचारू, असे त्यांनी स्पष्ट केले. रमेश थोरात, सुरेश घुले, अशोक पवार, जालिंदर कामठे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाचे संयोजन सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र चौधरी व तंटामुक्ती अध्यक्ष अमितबाबा कांचन यांनी केले होते.(वार्ताहर)
कर्जमाफी देता येत नसेल, तर सत्ता सोडा : सुप्रिया सुळे
By admin | Published: April 28, 2017 5:46 AM