लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर परजिल्ह्यातून व परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या शारीरिक तापमान तपासण्यासह त्यांच्या जवळील आरटी-पीसीआर चाचणीचा ‘निगेटिव्ह’ अहवाल देखील तपासला जात आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र व्यवस्था केली. मात्र एसटी बसस्थानकावरचे चित्र वेगळे आहे. प्रवासी सेवा सुरू नसल्याने प्रवासी नसतीलच असे गृहीत धरून आरोग्य विभागाने बस स्थानकावर तपासणीची कोणतीच व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे बस स्थानकावरून कोणत्याही तपासणी विना नागरिक पुणे शहरात दाखल होत आहेत.
शनिवार पासून पुणे शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले. परजिल्ह्यातून अथवा राज्यातून दाखल होणाऱ्या नागरिकांना आपल्या कोरोना तपासणी (आरटी -पीसीआर) चा निगेटिव्ह अहवाल बाळगणे अनिवार्य आहे. ‘अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवेश द्या,’ असे आदेशात म्हटले आहे. पुणे स्थानकावर या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याचे लोकमत पाहणीत दिसून आले. बसस्थानकावर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठीचे नियोजन नसल्याचे आढळले.
रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पादचारी पुलावर आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी टेबल मांडून त्या ठिकाणी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची तपासणी करीत आहे. स्थानकावरचे तिकीट निरीक्षक हे प्रवाशांचे तिकीट तपासल्यावर त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांकडे पुढील कार्यवाही साठी पाठवत आहे.