सासवड : तालुक्यातील पाण्याच्या सर्व योजना बंद आहेत. नुसत्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. परंतु तुम्हाला जर तालुक्यातील जनतेसाठी पाचशे रुपयांचा टँकर सुरू करता येत नसेल तर तुमचे हजारो कोटी रुपयांचे विमानतळ काय खायचे आहे का? असा जळजळीत सवाल मनसेच्या शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांनी पुरंदरच्या प्रशासनाला केला आहे.टँकरच्या मागणीसह तालुक्यातील बंद असलेल्या नळपाणी योजना सुरू करण्यासाठी सोमवार दि.२१ रोजी मनसेचे नेते बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनखाली पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करण्यात आले. तुम्हाला आम्ही निवडून दिले आणि आता आम्हालाच त्रास देणार असाल तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, अशा शब्दात अप्रत्यक्षरीत्या राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती मीनाताई जाधव, जि. प. सदस्या संगीता काळे, दिवे गावच्या सरपंच स्मिता लडकत, झेंडेवाडी गावच्या सरपंच मीना झेंडे, ग्रामपंचायत सदस्य स्मिता काळे, नंदा जाधव, गुलाब झेंडे, योगेश काळे, प्रतीक्षा जाधव, अविनाश झेंडे, त्याच प्रमाणे मनसेचे पदाधिकारी आणि दिवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. तर प्रशासनाच्या वतीने पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, सदस्य रमेश जाधव, सुनीता कोलते, सोनाली यादव, गोरखनाथ माने, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शालिनी पवार, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे आदि उपस्थित होते.> ठरावावर तलाठी, ग्रामसेवक यांच्या सह्या नसल्याने आम्हाला कार्यवाही करता आली नाही. तसेच टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. परंतु अधिकृत प्रस्ताव आल्यानंतर त्याची पाहणी करून तातडीने कार्यवाही केली जाते. आजही अपूर्ण ठराव आलेला आहे तो आमच्या पातळीवर पूर्ण करून टँकर लगेचच सुरू केला जाईल.- मिलिंद टोणपे,गटविकास अधिकारी
टँकर मिळत नसेल तर विमानतळ खायचेय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 1:57 AM