पुणे : भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात शहराचे कचऱ्यापासून सार्वजनिक आरोग्यापर्यंत व पाण्यापासून ते वाहतुकीपर्यंत सर्वच प्रश्न बिकट होत चालले आहेत. त्यांना कोणत्याही विषयावर उपाययोजना करता येत नाही. सत्ता राबवण्यात अपयश येत असल्याने काम करता येत नाही तर खुर्च्या खाली करा, अशी मागणी करत काँग्रेसच्या शहर शाखेने बेलबाग चौकात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर यावेळी टीका करण्यात आली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, शहराच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. पुणेकरांनी खासदारकी, आमदारकी व पुन्हा पालिकेतील सत्ताही त्यांना दिली. इतकी सत्तास्थाने असतील तर पुण्याचे नंदनवन करायला हवे. पण त्यांना काहीच जमायला तयार नाही. पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही. वाहतूककोंडीही सुटत नाही. सार्वजनिक आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. मग हे करतात तरी काय, असा प्रश्न आता पुणेकरांना पडू लागला आहे. त्यांचाच आवाज म्हणून काँग्रेस हे आंदोलन करत आहे.भाजपा काम काहीच करत नाही व हेल्मेटसक्ती करून पुणेकरांना वेठीला मात्र धरत आहे, अशी टीका पालकमंत्री बापट यांच्यावर करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली. सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी, रवींद्र धंगेकर, अजित दरेकर, मुकारी अलगुडे, सोनाली मारणे, प्रदीप परदेशी, बाळासाहेब आमराळे, चंद्रशेखर कपोते, विजय खळदकर, प्रवीण करपे, सुनील धाडगे, सुजित यादव आदी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.>शहर महिलातर्फे मंगळवारी हंडा मोर्चाशहर महिला काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पाणी कपात करण्याच्या निर्णयाविरोधात २९ जानेवारीला हंडामोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसभवनपासून हा मोर्चा महापालिकेवर नेण्यात येईल, अशी माहिती शहराध्यक्ष सोनाली मारणे यांनी दिली.
काम करता येत नाही तर खुर्च्या खाली करा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:39 AM