पुणे : रेशनवरील गहू आणि तांदूळ वेळेत मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. धान्याची उचल वेळेत न केल्याने अन्नधान्य पुरवठा अधिकारी कार्यालयाने धान्याची उचल उशिरा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालयातील अन्नधान्य पुरवठा विभागाकडे केली आहे. नोव्हेंबरचे धान्य महिनाअखेरपर्यंत मिळत असल्यास धान्यवाटप कसे करावे, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.
शहरात गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटप वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच सप्टेंबरमध्येही तांदळाचे पूर्ण वाटप झाले नव्हते. शहरासाठी महिन्याला ४ हजार टन तांदळाची गरज असते. मात्र, सप्टेंबरमधील ११० टन तांदूळ मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना तांदळाचे वाटप झालेच नाही. तरीदेखील या लाभार्थ्यांना सप्टेंबरमधील तांदळाचे वाटप ऑक्टोबरमध्ये करण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली नाही. हीच स्थिती ऑक्टोबरमध्येही कायम होती. ४ हजार टनांपैकी गोंदिया जिल्ह्यातून १ हजार ९०० टन तांदूळ मिळणार होता. ऑक्टोबरचे १९ दिवस संपले तरीदेखील हा तांदूळ अद्याप शहरात दाखल झालेला नव्हता. ऑक्टोबरअखेरीस दिवाळी सण असतानाही ग्राहकांना धान्य मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते. यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते.
नोव्हेंबरमध्येही धान्यवाटप उशिरा सुरू झाले आहे. बुधवारपर्यंत (दि. २१) अनेक दुकानांमध्ये गहू व तांदूळ दिला जात आहे. हे धान्य ३० नोव्हेंबरपर्यंतच वितरित करावे लागणार आहे. ई पॉस मशिनमुळे तांत्रिकदृष्ट्या मात्र, हे शक्य नसल्याने धान्यवाटप करण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी केली आहे. नोव्हेंबरमध्ये गहूदेखील वेळेत मिळाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडून वेळेवर धान्य मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचा रोष दुकानदारांना सहन करावा लागतो. धान्यवाटप नीट होत नसल्याचे कारण देत दुकानांची तपासणी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. एकीकडे धान्यवाटप कोट्यानुसार न देता दुसरीकडे चौकशी केली जात आहे.
धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे
याबाबत प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ म्हणाले, “सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचा धान्याचा कोटा दुकानदारांपर्यंत पोहचला होता. नोव्हेंबरचाही धान्य कोटा दिला आहे. मात्र, धान्याची वेळेत उचल झाली नाही हे खरे आहे. त्याबाबत धान्य उचलणाऱ्या कंत्राटदाराला आत्तापर्यंत दर तीन दिवसाला एक अशा चार नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणीदेखील या प्रस्तावात करण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून धान्यवाटपाची साखळी तुटली आहे. महिन्याचे धान्य हे आदल्या महिन्याच्या अखेरीस मिळणे अपेक्षित असते. धान्याची उचल उशिरा झाल्यास जास्तीत जास्त तीन तारखेपर्यंत धान्य मिळाल्यास सात तारखेपासून धान्य वाटपास सुरुवात करता येते. दर महिन्याच्या सात तारखेला अन्नसुरक्षा दिन साजरा करून धान्य वाटपाला सुरुवात करण्यात येते. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून धान्य वेळेतच मिळत नसल्याने ग्राहकांना वितरण वेळेत होत नाही. - गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे
डिसेंबरचे धान्यवाटप धान्य उचल सोमवारपासून सुरू झाली असून, पुढील आठवड्यात दुकानदारांपर्यंत धान्य पोहोच केले जाणार आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे