SSC Result: 'परीक्षा झाल्याच नाही तर विक्रमी निकाल लागणारच'; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 05:54 PM2021-07-16T17:54:01+5:302021-07-16T17:54:09+5:30
नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे निकाल काढण्यात आला.
पुणे: राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. त्याबाबत पुण्यातील आढावा बैठकीत प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.
पवार म्हणाले, दहावी विद्यार्थ्यांच्या पालकांना नेहमी वाटत असते. कि, आपल्या मुलाला चांगले मार्क मिळावेत. राज्याचा निकाल ९९ टक्के लागला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. परीक्षा झाल्याचं नाही तर विक्रमी निकाल लागणारच अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली आहे.
कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली.
शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले. नववीचा अंतिम निकाल, दहावीचे वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याच्या आधारे विषयनिहाय निकालासाठीचे गुणदान करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य स्तरावर १५ जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली. शुक्रवारी ऑनलाइन जाहीर होणारा निकाल विद्यार्थ्यांना डाऊनलोड करून त्याची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.