पुणे : काही जण आपल्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागत असून पैसे दिले नाही तर, तुमचा आसाराम बापू करु. त्याचे चित्र २ -३ दिवसात दिसले अशी मला धमकी दिली जात आहे. माझ्याविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले जात असून मी त्याचे खंडण करतो. माझी बदनामी करणाऱ्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा दावा लावणार असल्याचे मनोहर चंद्रकांत भाेसले यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.
साेलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहरमामा भोसले यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून आरोप केले जात आहे. त्याबाबत भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडण केले. यावेळी ॲड. रुपाली ठोंबरे पाटील आणि ॲड. विजय ठोंबरे उपस्थित होते.
मनोहर भोसले यांनी सांगितले की, ना मी कोणताही अवतार आहे. ना कोणता बाबा, ना कोणता महाराज, मी केवळ श्री बाळूमामांचा निस्सिम भक्त म्हणून त्यांची सेवा करत आहे. माझ्या वैयक्तिक श्रद्धेतून मी बाळूमामांचे मंदिर उभारले आहे. लोक दर्शनासाठी येत असतात. मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला आहे. त्या माध्यमातून अनेक लोकांना धार्मिक सल्ले व पारायण करण्याचा सल्ला देत असतो. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्या लावण्याच्या पार्किंगवरुन काही स्थानिक लोकांच्या मनामध्ये राग आहे. त्यामुळे मी भक्तांकडून पैसे उकळतो, असे देखील माझ्यावर आरोप होत आहेत. मी कोणत्याही व्यक्तीस एकही रुपयांची मागणी केली नाही. तेथे आलेले भक्तगण हे त्यांचे स्वच्छेने शिवसिद्धि संचालित श्री मामा संस्था या संस्थेकडे देणगी देतात ही देणगी केवळ मंदिर बांधकाम तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते.
मालिकेच्या सुरुवातीला दाखविला जाणारा माझा फोटो काढायचा की ठेवायचा हा निर्मात्याचा प्रश्न
बाळूमामाचे कार्य घराघरात जावे, या हेतूने या मालिकेसाठी कथा पुरविली आहे. त्याच्या रजिस्टेशनसाठी मनोहर मामा हाय लँड एलएलपी ही कंपनी स्थापन केली आहे. त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही. आता मालिकेच्या सुरुवातीला दाखविला जाणारा माझा फोटो काढायचा की ठेवायचा हा निर्मात्याचा प्रश्न आहे. उंदरगावच्या मठात रितसर मीटर घेऊन वीज घेतली आहे. सोलर प्लॅंटद्वारे येथे वीजेचा वापर केला जातो.
आमची ही धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने त्यांनी मला व भक्तांना खंडणी देखील मागितली आहे. मी त्यांना खंडणी न दिल्यास ते माझ्यावर व भक्तांवर खोटेनाटे आरोप करुन गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने मी करमाळा पोलीस ठाण्यात खंडझी मागितल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. बारामती येथे गुन्हा दाखल करणारा माझा भक्त आहे. त्याने २०१५ च्या घटनेचा आता कोणाच्या सांगण्यावरुन तक्रार केली आहे. इतके वर्ष तो का गप्प होता, असे मनोहर भोसले यांनी सांगितले.