लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : न्यायालयात वाहनावरील दंडाची रक्कम भरण्यासाठी वाहनधारक गेले. तडजोड करून दंडाची रक्कम कमी होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, दोन ते तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर दंडाची पूर्ण रक्कम भरावी लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तडजोडच करायची नव्हती तर लोकअदालतीत बोलावले कशाला? असा संतप्त सवाल शनिवारी लोकअदालतीत सहभागी झालेल्या वाहनधारकांनी उपस्थित केला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरण्याबाबतचे दोन लाख दावे लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. तडजोडअंती ठरावीक रक्कम भरावी, असे मेसेज एका खासगी कंपनीमार्फत यातील वाहनधारकांना पाठविण्यात आले होते. त्यातील अनेकांनी दंडाची रक्कम ऑनलाइन भरली, तर शेकडो वाहनधारक न्यायालयात आले होते, तर अनेकांना न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयात दंडाबाबतच्या दहा पॅनेल समोर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तडजोड करून दंडाची रक्कम कमी होईल, अशी त्यांना आस होती. मात्र, पूर्ण दंड भरा आणि प्रकरण मिटवून टाका, असे त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आल्याने लोकअदालतीत सहभागी झालेल्या अनेकांच्या पदरी निराशा पडली.
--------
वाहनधारकांच्या दंडाच्या रकमेबाबत असलेल्या तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या आहेत. नोटीस आली असेल व त्यातील रक्कम, नाव, गाडी नंबर, पत्ता याबाबत काही फरक असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तसेच डेडाची पूर्वतपासणी करण्यात येणार आहे. ज्यांनी लोकअदालतीत दंडाची रक्कम भरली नाही त्यांच्यावर देखील तूर्तास कोणतीही न्यायालयीन कारवाई केली जाणार नाही. दंड कमी करण्याबाबत पुढील वेळी विचार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.
- प्रताप सावंत, सचिव, विधी सेवा प्राधिकरण
-