युगंधर ताजणे-
पुणे : घरातच बसा, घरात राहा, विनाकारण बाहेर फिरू नका. आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या. असे आवाहन सातत्याने पोलीस करत असून देखील त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. यावर आता आपल्या सोसायटीमधील रहिवासी विनाकारण बाहेर पडल्यास त्याला दंड करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही सोसायट्यांनी हा आगळा वेगळा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. सोसायटीमधील कमिटीला पूर्वसूचना न देता एखादी व्यक्ती बाहेरगावावरून कुणाकडे आल्यास, तसेच कुणीही विनाकारण सोसायटीच्या बाहेर पडल्यास त्याला किमान 150 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्याबरोबरच इतरांच्याही आरोग्याचा विचार करणे अपेक्षित आहे. हा त्यामागील दंडाचा हेतू आहे. कोरोनाचा संसर्ग सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील काही भाग पूर्णत: बंद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणा?्या विक्रेत्यांना वेळेची मयार्दा घालून दिली आहे. पोलीस प्रशासन युद्धपातळीवर काम करत असताना अद्याप काही नागरिकाडून नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले आहे. यावर खराडी, हडपसर, विमाननगर, केशवनगर, मांजरी या भागातील सोसायटयांनी आपल्या सोसायटी मधील व्यक्तीना विनाकारण बाहेर पडण्यास मनाई केली आहे. या सूचनेचे पालन न केल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, कोरोनावर मात करायची असल्यास घरात राहावे , लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना सहकार्य करावे हा त्यामागील उद्देश असल्याचे सोसायटी मधील रहिवाशांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले म्हणाले, अद्याप लोकांना परिस्थितीचे गंभीरता समजली नाही. ते बाहेर फिरताना दिसत आहे. अशावेळी त्यांना दंडाची भीती दाखवली गेल्यास त्याउद्देशाने का होईना ते घरात राहतील. एकाच्या चुकीचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे करावे लागेल.
* सोसायटीचे नियम आहेत त्याच्या चौकटीत राहून सर्व काळजी घेण्यात आली आहे. सुरुवाटीला सोसायटी मध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची तपासणी करून घेण्यात आली. सोसायटी देखील सॅनिटाईज करण्यात आली आहे. रहिवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. सोसायटीमध्ये कुणीही बाहेरून नवीन व्यक्ती आल्यास त्याची माहिती देण्यास बजावले आहे. व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्याद्वारे कुणाला काय हवे ते विचारले जाते. सगळ्यांची एकत्रित यादी तयार केली जाते. ती दुकानदाराला पाठविल्यावर त्याच्याकडून ती घेऊन त्या वस्तूंचे वाटप केले जाते. रहिवाशांनी बाहेर पडू नये असे दंड करण्यामागे कारण आहे. - निलेश सोनाग्रा (चेअरमन, बेला व्हिस्टा सोसायटी, विमाननगर)