राजगुरूनगर: खेड तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील परसुल येथे महिलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली असून दिवसभरात विहिरीवरुन दोनच हांडे घरी पाणी न्यायचं. तिसरा हंडा भरला तर. शंभर रूपये दंड भरायचा असा नियमच ग्रामस्थांनी घातला आहे.
खेड तालुक्यात कोट्यवधी रुपयाची जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. मात्र आजही काही गावे ताहनलेलीच आहे. आजही पुर्व भाग व पश्चिम भागातील काही गावाला टँकरचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील परसुल गावात पाण्यासाठी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून दोन महिने कडक उन्हाळ्याचे दिवस असणार आहे. गावात पूर्वीची जुनी विहिर असून या विहिरीला जेमतेम पाणी आहे. अजून दोन महिने या विहिरीतील पाणीसाठा टिकावा यासाठी ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला. माहिलांनी दिवसाला दोनच हंडे विहिरीतुन पाणी घरी आणयचे. तिसरा हंडा नेला तर शंभर रुपये दंड भरायचा असा नियम ग्रामस्थांनी घातला आहे. त्यामुळे जनावरांना पाण्यासाठी रानोमाळ पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
आमच्या कित्येक पिढ्या गेल्या पण पाणी टंचाई दूर झाली नाही. उंच टेकडी चढून पाणी आणावे लागते. याचा वयोवृद्ध महिलांना मोठया प्रमाणात त्रास होतो. विहिरीची पाणी पातळी खाली गेली असल्याने आम्ही प्रती घर दोन हंडे असा नियम बनवला आहे. तिसरा हंडा पाणी भरणाऱ्याला शंभर रुपये दंड आकारण्याचा नियम केला आहे. पाणी स्वच्छ असल्याने आरोग्यासाठी चांगले आहे. गावात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने गावातील बहुतांश लोक मुंबई येथे रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत.- स्वाती दिलीप शिंदे, परसुल गावच्या रहिवाशी
पिण्याच्या पाण्यासाठी गावची एकमेव विहीर असून पाण्याचा काटकसरीने वापर करत आहोत. पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यास ग्रामस्थ खासगी बोअरवेल, विहीर यांचा वापर करतात. जलजीवन योजना गेली ३ वर्ष झाले खोपेवाडी या ठिकाणी तिचे काम सुरु आहे. ते अजून पूर्ण झालेले नाही. आमचा पाणी प्रश्न लवकर सुटावा म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टेपाटील यांची भेट घेतली असून त्यांनी पाणी टंचाई मुक्त परसुल गाव करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.- सारिका बाळासाहेब शिंदे, उपसरपंच परसुल