लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास अशा नागरिकांवर ५०० रुपये दंड तसेच नागरिकाने वापरलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्याचे अधिकार पोलीस प्रशासनास देण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या बाबतची नियमावलीही प्रसिध्द केली आहे.
कोरोना १९ विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा करून ब्रेक द चेनबाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे.
याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने संपुर्ण राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यावर आपत्ती व्यवस्थापन बंदोबस्त व नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. याचबरोबर होम क्वाॅरंटाईन बाधित रुग्णांवर लक्ष ठेवणेसाठी, कोविड टेस्टिंग रुग्णालय व लॅब, हॉटस्पॉट गावे, हाय अलर्ट व अलर्ट गावे इत्यादी ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्याचे ग्रामीण भागामध्ये नागरिकांना अत्यावश्यक काम व कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करणेत आलेला आहे. यामुळे नागरिकांना आंतरजिल्हा व इंटरसिटी प्रवासाकरीता ई -पास काढणे अत्यावश्यक आहे.