पुणे : अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा पक्षच फोडला. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेले ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अशातच मनसे नेते वसंत मोरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांचा फोटो फेसबुकला शेअर करत सरकारला आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता तरी करा मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते. अशी त्यांनी पोस्ट केली आहे.
वसंत मोरे म्हणतात, २०१९ ते २०२३ या ४ वर्षात झालेल्या राजकीय खेळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजितदादा पवार ३ वेळा उपुख्यमंत्री ,१ वेळा विरोधीपक्षनेता, श्री.देवेंद्र फडणवीस १ वेळ मुख्यमंत्री, १ वेळ विरोधी पक्षनेता १ वेळ उपुख्यमंत्री आणि आता थोड्याच दिवसात कदाचित पुन्हा मुख्यमंत्री, आता वर्षभर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आता परत जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता आरे म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राची सत्ता आपापसात वाटून घेताय का? असा मोरे यांनी उपस्थित केला आहे.
''सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच. हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता तरी करा मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते असे आव्हान मोरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिले आहे.''
राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत.