लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाबाधित झाल्यानंतर घरी विलगीकरणात (होम आयसोलेशेन) थांबणे अपेक्षित असतानाही अनेक रुग्ण सर्रास बाहेर फिरत आहेत. त्यांच्यामुळे अन्य पुणेकरांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा बेशिस्त कोरोनाबाधितांची तक्रार महापालिका पोलिसांना करणार आहे. इतरांच्या संसर्गास कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित वाढत असले तरी बहुतांशी कोरोनाबाधित लक्षणेविरहित आहेत. त्यामुळे सुमारे ८५ टक्के रुग्ण ‘होम आयसोलशेन’चा पर्याय स्वीकारत आहेत. परंतु, यापैकी अनेक जण एक-दोन दिवस घरात थांबल्यावर, विलगीकरणाचा कालावधी संपण्यापूर्वीच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून होणारा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी महापालिका विलगीकरणातील रुग्णांवर नजर ठेवणार आहे.
दरम्यान, कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा अधिकाधिक शोध घेण्यासाठी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे. यासाठी आरोग्य विभागाने १५ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय कार्यालयनिहाय ९८ पथकांची नियुक्ती केली आहे. याव्दारे प्रत्येक पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील वीस व्यक्तींना शोधले जाऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे़
चौकट
कोरोना रुग्णांवर कडक नजर
‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारणाऱ्या कोरोनाबाधितांच्या हातावर शिक्के मारणे, त्यांच्या घराच्या दरवाजावर ‘कोविड-१९’ची नोंद करणे, संबंधित रुग्णाच्या सोसायटीबाहेर फलक लावणे, सोसायटी अध्यक्षांना त्यांना घराबाहेर पडू न देण्याबाबत सूचित करणे आदी उपायही पुन्हा सुरू केले जाणार आहे. महापालिका यंत्रणा दररोज त्यांना फोन करून माहिती घेणार असल्याचे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.