पुणे : नागरिकांनी भरलेल्या करामधून योजनांवर भरमसाठ खर्च केला जातो. मग, या योजनांची माहिती नागरिकांना दिली जात नाही. योजना आणताना त्यांची मते विचारातही घेतली जात नाहीत. प्रशासनाने ही भुमिका बदलणे आवश्यक असून नागरिक, स्वयंसेवी संस्थांना जाहिर व्यासपीठावर सर्व प्रकल्पांची सादरीकरणासह माहिती दिली जावी अशी मागणी सजग नागरिक मंचाने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत सजगचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि सारंग यादवडकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यादवडकर म्हणाले, पालिकेच्या प्रकल्पांचा थेट परिणाम शहराच्या विकासासह रचना आणि पर्यायाने पर्यावरणावर होत आहे. पालिकेने आणलेल्या समान पाणी पुरवठा योजनेसाठी पाणीपट्टी वाढविली. या प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च होऊनही काम मात्र नाममात्रच झाले आहे. नागरिकांसमोर सर्व प्रकल्पाची खरी माहिती आली पाहिजे.
उत्त्म हवामान, टेकड्या आणि नद्या हा पुण्याचा वारसा आहे. या वारशाचे रक्षण होणे आवश्यक आहे. शहरातील प्रकल्प या वारसाचा घास घेणार नाहीत ना याचीही काळजी घेतली जावी. पालिकेच्या प्रकल्पांची जाहिर सादरीकरणाद्वारे माहिती नागरिकांना दिली जावी. हे सादरीकरण सर्वांसाठी खुले असावे, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.
==
विकास आराखड्यात काही टेकड्यां फोडून बोगदे तयार करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे टेकड्यांवर अतिक्रमण वाढण्याचा धोका आहे. हे बोगदे झाल्यास त्याचा भूजल पातळीवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे टेकड्यांची लचकेतोड होऊ न देता पर्याय शोधणे आवश्यक असल्याचे यादवडकर पत्रकार परिषदेत म्हणाले.