लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील ५४ गावांतील (बिनविरोध गावे वगळून) मतदानाची आवश्यक ती सर्व तयारी झाली आहे. तालुक्यातील २०९ मतदान केंद्रांवर १ हजार १४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी शांततेत व निर्भीडपणे मतदान करण्याचे आवाहन हवेली तालुक्याचे तहसीलदार सुनील कोळी यांनी केले आहे. तालुक्यातील दुबार मतदान टाळण्यासाठी तालुक्यात सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातून स्थलांतरित झालेले, मृत झालेले अथवा त्या ठिकाणी न सापडलेल्यांची निवडणूक विभागाने यादी बनवली असून ती मतदान केंद्रावर पाठवण्यात आली आहे. मतदान करतांना या यादीतील नावे आढळली तर संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे.
लोणी काळभोर येथे मंगळवार (१२ जानेवारी) रोजी रात्री दोन गटांत झालेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून हवेेेली उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यांना लेखी पत्र देण्यात आले आहे. याद्वारे त्यांना आवश्यक ती कुमक बंदोबस्तासाठी मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत विशेष लक्ष ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर,मांजरी खुर्द,वडकी या ग्रामपंचायतीसह राज्यभरातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत, संबधित ग्रामपंचायतीच्या शेजारील गावातील मतदारांची नावे दाखल झालेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत काहींनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे काही मतदान केंद्रावर एएसडी यादी पाठवली आहे. बीएलओ यांनी केलेल्या सर्वेक्षणात काही ठिकाणी मतदारांची अनुपस्थिती आढळून आली आहे. त्यामुळे एएसडी यादीनुसार त्या यादीमधील मतदारांना स्थानिक गावांतील ओळखपत्राचा रहिवासी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधितांना मतदान करणेबाबत प्रतिबंध करण्याबाबत मतदान केंद्र अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली.