ट्रॅव्हल्स व्यवसायावरील ‘विघ्न’ दूर
स्टार ११८६
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून तोट्यात असलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारले आहे. गणेशोत्सवाच्या काळात ट्रॅव्हल्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपतीसाठी गावी जाणाऱ्या भक्तांची संख्या यंदाच्या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेने जास्त होती. परिणामी आता परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या बहुतांश गाड्या फुल्ल आहेत. याचाच परिणाम म्हणून ट्रॅव्हल्स चालकांनी दोनशे ते पाचशे भाडेवाढ केली आहे. कोकणातून व नागपुरातून पुण्याला येणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. त्याचे तिकीट दर ५०० रुपयांनी वाढले आहे.
पुण्यात रोज जवळपास राज्यांतर्गत व परराज्यातून जवळपास ९०० ट्रॅव्हल्सची ये-जा असते. यातून रोज ३० ते ३२ हजार प्रवासी येतात आणि जातात. पुण्यातून सर्वाधिक ट्रॅव्हल्स या नागपूरसाठी धावतात. गणेशोत्सवासाठी गावी गेलेले प्रवासी आता परतीचा प्रवास करून पुणे गाठत आहे. मात्र भाडेवाढ जास्त असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे. नागपूरसह, रत्नागिरी, अकोला, गोवा या शहरातून पुण्याला येणाऱ्या ट्रॅव्हल्सची भाडेवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यानंतर कोल्हापूर, सोलापूर, लातूरसाठीदेखील ५० ते १०० रुपयांची भाडेवाढ झाली आहे.
बॉक्स २
दोन वर्षांनंतर चांगले दिवस
मागील दोन वर्षांपासून ट्रॅव्हल्स व्यवसायाची स्थिती चिंताजनक होती. आता परिस्थिती थोडी बदलली आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला. पुण्याला येणाऱ्या गाड्यामध्ये बुकिंग चांगले झाले. तिकीट दरातदेखील वाढ झाली आहे.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना, पुणे.
बॉक्स ३
ट्रॅव्हल्स चालकांनी केलेली भाडेवाढ ही सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. ५० ते १०० रुपयांची झालेली दरवाढ एकवेळ ठीक आहे. मात्र ४०० ते ५०० रुपयांची भाडेवाढ ही न परवडणारी आहे. ट्रॅव्हल्स चालकांनी सामान्य प्रवाशांचा विचार करून भाडेवाढ करावी.
- संजय कुंभार, प्रवासी
--------------------------
बॉक्स १
मार्ग, आधीचे तिकीट दर, सध्याचे दर
१. नागपूर-पुणे ८०० १२००
२.पणजी-पुणे ७०० ९००
३. रत्नागिरी-पुणे ८०० १२००
४.अकोला-पुणे ७०० १२००