शिक्रापूर: शिक्रापूर (ता .शिरूर) येथे दवाखाना चालवायचा असेल तर महिन्याला २५ हजार रुपये द्यावे लागेल. नाहीतर दवाखाना चालू देणार नाही. तसेच तुझ्याविरुद्ध खोटया तक्रारी दाखल करू, असे धमकावून पैसे मागितल्याप्रकरणी शिक्रापुरच्या माजी सरपंचाविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रामेश्वर बंडगर (मुळ रा.सोईट, पो.धानोरा, ता.उमरखेड, जि.यवतमाळ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवरून माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ज्या डॉक्टरने सासवडे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली त्यांचेच अपहरण करण्यात आले होते. शिक्रापूर पोलिसांनी या डॉक्टरला पुण्यातून ताब्यात घेतले. फिर्याद मागे घ्यावी म्हणून त्यांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी सासवडे यांच्यासह शाम सासवडे, सुभाष सांडभोर, गणेश लोखंडे आदी एकुण चौघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी मयुर वैरागकर यांनी दिली.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर विठ्ठलराव बंडगर (वय २८, रा. माळीमळा शिक्रापूर, ता. शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. १० दिवसांपूर्वी २४ ऑक्टोबर रोजी शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व तुला शिक्रापूर गावाच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला पंचवीस हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, तसेच खोटया तक्रारी दाखल करू असे म्हणून पैसे मागितले.
दरम्यान, रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी बंडगर हे घरी निघाले असताना सुभाष सांडभोर यांनी त्यांना बोलावून घेत शाम सासवडेने त्यांना धमकावले व गणेश लोखंडेसह पुण्यातील एका हॉटेलात डांबून ठेवले. ही माहिती बंडगर यांनी तपास अधिकारी वैरागकर यांना मेसेज टाकून कळविल्यावरुन मयुर वैरागकर व पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी तात्काळ पावले उचलत ही कारवाई केली.