लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘‘मोठ्या पदावरील व्यक्ती तुमच्या मागे लागल्या असून, तुमच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. तुमच्याविरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला आहे. तुमच्या अटकेचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातून वाचायचे असेल तर आम्हाला २ लाख रुपये द्यावे लागतील,’’ असे सांगून शहरातील माहिती अधिकार कार्यकर्त्याला दोन लाखांची खंडणी मागून ७५ हजारांची रक्कम स्वीकारणाऱ्या दोन तोतया पत्रकारांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल कांबळे व जहीर मेमन अशी ताब्यात घेतलेल्या तोतया पत्रकारांची नावे आहेत. सुधीर रामचंद्र आलाट (५१, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आलाट हे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल कांबळेने आलाट यांना फोन करून भेटायला बोलावले होते. त्या वेळी आलाट यांनी त्याला मला डोळ्यांचे आॅपरेशन करायचे असल्यामुळे लवकरच भेटू असे सांगितले. मात्र, कांबळे यांनी आलाट यांना तुम्ही मला लवकरच भेटा तुमच्याविरुद्ध मोठे कांड चालू आहे. जर तुम्हाला प्रकरणातून वाचायचे असेल तर आम्हाला २ लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही रक्कम दिल्यास सुरक्षित राहाल नाहीतर पोलीस अधिकारी तुम्हाला अटक करतील, अशी धमकी दिली. कांबळे यांनी पोलीस अधिकारी, वकील व इतर दोन ते तीन जणांना फोन करून आलाट यांच्याविरुद्ध आम्ही केलेल्या तक्रारी मागे घेत आहोत असे सांगितले. यानंतर आलाट यांनी दोघांना ७५ हजारांची रक्कम दिली. मात्र राहिलेले १ लाख २५ हजार रुपयांसाठी दोघेही आलाट यांना वारंवार फोनवरून धमकी देत होते. वैतागून आलाट यांनी खंडणीविरोधी विभाग दोनकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकाने तोतया पत्रकारांना अटक केली.
---------------