मुंबई - बारामती येथे आज सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्व आणि गरज यासंदर्भात मार्गदर्शन केलं. एक अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हा सर्वांना आयुष्यात उपयोगी पडणारा, विज्ञानाप्रति सर्वांमध्ये एक आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने हाती घेतला आणि फार थोड्या दिवसात हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्हाला ज्यावेळी प्रत्यक्ष या केंद्रास भेट द्यायची संधी मिळेल त्यावेळी माझी खात्री आहे की तुमच्या ज्ञानात आणि औत्सुक्यात भर पडेल. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर वैज्ञानिक भूमिका स्वीकारावी लागेल. भाकड समजुती, खोटेपणा या गोष्टींनी व्यक्तीचे मन तयार होत नाही आणि विज्ञानावर आधारीत ज्ञान घेऊन मानसिकता तयार करण्याची काळजी आपण घेतली तर जीवनात तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा जीवनमंत्रच त्यांनी आपल्या भाषणातून दिला. या केंद्राला तुम्ही भेट द्याल तेव्हा विज्ञानाने किती चमत्कार केले आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
प्रकल्प पाहून तुमचा आत्मविश्वास वाढेल
माझी खात्री आहे की त्यासाठी इथले केंद्र तुम्हा सगळ्यांना उपयोगी पडेल. राजेंद्र पवार, त्यांचे सर्व सहकारी, प्राध्यापक वर्ग या सगळ्यांनी कष्ट केले आणि एक अतिशय देखणा प्रकल्प आज याठिकाणी उभा केला. हा प्रकल्प पाहिल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल व तुम्हाला समाधान लाभेल.विज्ञानासंबंधीचे आकर्षण तुम्हाला अखंड राहील. त्यासाठी हा प्रकल्प तुम्हा सगळ्यांना प्रोत्साहन देईल. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात व तुमच्यातील काहींनी हा प्रकल्प पाहिला. ज्यांनी पाहिला नाही ते पुढील दिवसात निश्चितच हा प्रकल्प पाहतील हा विश्वास व्यक्त करतो.
आजच्या या कार्यक्रमाला काकोडकर व गौतम अदानी व सौ. अदानी हे अगत्याने आले व या कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहित केले. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील तसेच देशातील वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नेहरू सायन्स सेंटर असेल, नेहरू सेंटर असेल अशा विज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था व त्या संस्थांचे प्रमुख शास्त्रज्ञ आज याठिकाणी व्यासपीठावर आहेत ही आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे, असे म्हणत पवारांनी सर्वांचे आभार मानले.